पूर्णा:(सुशील दळवी)
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तहसील कार्यालयात काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून विविध कार्यालयांमध्ये फर्निचरचे काम करण्यात आले. शासनाचा मोठा निधी खर्च करून कार्यालयाचे सुशोभीकरण करण्यात आले असले, तरी या कामाच्या नियोजनावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात नायब तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली असून, पावसाचे पाणी थेट कार्यालयात झिरपत आहे. त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेले फर्निचर ओले होऊन त्याचे नुकसान होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
विशेष म्हणजे, लाखो रुपयांचा निधी खर्च करून फर्निचर बसविण्यात आले; मात्र इमारतीच्या गळतीची दुरुस्ती न करता केवळ बाह्य स्वरूपावर खर्च करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. परिणामी, शासनाच्या पैशाचा अपव्यय झाल्याचा आरोप होत असून संबंधित कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
फर्निचरवर लाखो खर्च; पण गळतीकडे दुर्लक्ष? चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
नायब तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने दररोज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला व दिव्यांगांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घसरून अपघात होण्याचाही धोका निर्माण झाला असून, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
लाखो रुपयांचे फर्निचर बसविण्यापूर्वी इमारतीच्या स्लॅबची दुरुस्ती का करण्यात आली नाही? काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणी कोणी केली? शासनाचा निधी खर्च करूनही पहिल्याच पावसात गळती सुरू होणे हे निकृष्ट नियोजनाचे लक्षण नाही का? असे संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व तांत्रिक चौकशी करून संबंधित ठेकेदार, कामावर देखरेख करणारे अधिकारी आणि मंजुरी देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच गळतीची तात्काळ दुरुस्ती करून शासनाच्या मालमत्तेचे होणारे नुकसान थांबवावे, अशी तीव्र मागणी नागरिकांतून होत आहे.
Shabdraj www.shabdraj.com