वाशिम : दि. 19 मार्च, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माय भारत’ (Mera Yuva Bharat) उपक्रमांतर्गत दिल्ली येथे आयोजित आंतरराज्य आदान-प्रदान शिबिरासाठी हिंगोली जिल्ह्यातील वडचुना येथील ग्रामीण भागातील युवक गजानन आडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशाचे यशवी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेप्रमाणे भारत सरकारच्या ‘माय भारत’ संघटनेच्या वतीने आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश विविध राज्यांतील युवकांमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण घडवून आणणे, राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे तसेच नेतृत्वगुणांचा विकास करणे हा आहे. या शिबिरात देशभरातील निवडक युवक सहभागी होणार असून त्यांना विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
गजानन आडे यांनी यापूर्वीही नाशिक येथे आयोजित भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा महोत्सव, ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान (दिल्ली) तसेच मुंबई येथे शासनाच्या इतर क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्राविण्य व सहभाग घेत हिंगोली जिल्हा व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या कार्यक्रमांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.
आता 19 मार्च 2026 ते 23 मार्च 2026 या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या या आंतरराज्य शिबिरात ते आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे प्रतिनिधित्व केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्र-गोवा राज्य ‘माय भारत’ केंद्राचे अधिकारी, दिल्ली मेरा युवा भारत केंद्र जिल्हा युवा अधिकारी दिवाकर बाहीती व इतर मंत्री महोदय व जिल्हा युवा अधिकारी शिवदास शर्मा तसेच लेखा अधिकारी अनिल ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या शिबिरादरम्यान विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेटी यांचा समावेश असणार आहे.
गजानन आडे यांच्या या यशाबद्दल स्थानिक स्तरावर त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून युवकांसाठी ही प्रेरणादायी बाब ठरत आहे.
Shabdraj www.shabdraj.com