04/02/26
Breaking News

वैकुंठ चतुर्दशी निमित्त ‘हर-हरी भेट’ उत्सव थाटामाटात

गंगाखेड / रामप्रसाद ओझा – वैकुंठ चतुर्दशी निमित्त शहरातील प्राचीन हेमाडपंथी श्री सोमेश्वर शिवालय (अंधारी महादेव) येथे भगवान श्री व्यंकटेश व श्री सोमेश्वर यांची पारंपरिक ‘हर-हरी भेट’ उत्सवपूर्वक संपन्न झाला. गेल्या तीन वर्षांपासून साजरा होत असलेला हा दैवी मिलाप सोहळा भाविकांसाठी भक्ती, अध्यात्म व सांस्कृतिक एकात्मतेचा अनुभव ठरला.

 

उत्सवापूर्वी लॉ. व्यंकटेश्वर मंदिरातील भगवान व्यंकटेश यांची उत्सव मूर्ती शहरातील राजवाडा, शनिमंदिर, श्रीराम चौक, भगवती मंदिर चौक, सराफा मार्केट मार्गे ढोल-ताशांच्या निनादात ‘लक्ष्मी रमण गोविंदा!’ जयघोष करीत मिरवणुकीसह सोमेश्वर मंदिरात आणण्यात आली.

यानंतर वैदिक ब्राह्मणांच्या मंत्रघोषात अभिषेक, अर्चना, मंगल आरती व पसायदान पठण करण्यात आले. वैष्णव गल्ली, तीवडगली तसेच शहरातील विविध भागातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. जंगम, ब्राह्मण तसेच सर्व समाजघटकांच्या उपस्थितीने भक्तीमय, सौहार्दपूर्ण वातावरण अनुभवास आले.

 

या सोहळ्याच्या यशात लॉ. व्यंकटेश्वर मंदिर येथील पुजारी पांडे महाराज, संस्थान विश्वस्त ॲड. पंकज भंडारी, प्रितेश भंडारी, तसेच रवि महाराज जोशी, राम पाठक यांचा सहभाग होता. तर ठाकूर बाफणा, नवनित सोमाणी, दुर्गेश ओझा यांच्यासह सोमेश्वर सेवा समितीतील सेवाधारी कार्यकर्त्यांनी उत्सवाची उत्तम व्यवस्था सांभाळली.

दैवी स्पंदनांनी भारलेला हा हर-हरी मिलाप सोहळा भाविकांच्या मनात शांती, समाधान व भक्तिभावाची अमिट छाप उमटवून संपन्न झाला.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …