04/02/26
Breaking News

एचएआरसी संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी,निराधार ताईला दिले उदरनिर्वाहाचे साधन

हिंगोली,दि 31 ः
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे गौरी गणपती सणाच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथील निराधार कांचन दिलीप राऊत यांना उदरनिर्वाहासाठी ऑल इन वन शिलाई मशीन तसेच जीवनावश्यक किराणा साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमावेळी एचएआरसी अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ राजकुमार भारूका, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशटी, समन्वयक प्रकाश डूबे, संजय लाहोटी, नीळकंठ अंभोरे, राजेंद्र खापरे आदी उपस्थित होते.
औंढा नागनाथ येथील रहिवासी असलेल्या कांचन दिलीप राऊत यांच्या पतीचे जून २०२५ मध्ये किडनीच्या आजाराने दुर्दैवी निधन झाल्यावर त्यांना वयाच्या अवघ्या काही २२ व्या वर्षी वैधव्य नशिबी आले.पतीच्या दुर्देवी मृत्यूनंतर सासरचा आधार गेला आणि माहेरात वडील नसल्यामुळे सध्या त्या आई सोबत माहेरी जवळा बाजार येथे आईसोबत राहत असून दुःख बाजूला सारून रोज शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना एक तीन वर्षाची मुलगी आहे.त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांच्या या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची दुःखद व्यथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुंगळाचे शिक्षक प्रकाश डूबे यांनी भेट घेऊन जाणून घेऊन ताईंची दुर्दैवी कहाणी एच.ए.आर.सी. संस्थेकडे मांडून त्या ताईंना शिलाई काम येत असल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून फॉल पिको सुविधा असलेली ऑल इन वन शिलाई मशीन तसेच किराणा सामान देण्याचे आवाहन केले.
लोकसहभागातून मदत
या उपक्रमासाठी संतोष वट्टमवार, कैलास मुटकुळे, हार्दिक ठाकर, महेश तोष्णीवाल, सत्यंजय हर्षे, सौ मीनल बालगरकाशी, सुहास पेकम, नंदकुमार डोंगरे यांनी आर्थिक सहयोग दिला ज्यामुळे या निराधार कुटुंबास शिलाई मशीन, किराणा साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

एचएआरसी संस्थेच्या वतीने आजवर परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ७४ निराधार, एचआयव्ही ग्रस्त, विधवा महिला व अनाथ मुलींना ४५ शिलाई मशीन, ९ डाळ काढायची मशीन, २ पिठाची गिरणी व १७महिलांना शेळी व करडू व १ बेंटेक्स दागिन्यांचे फिरते दुकान द्वारे स्वयंरोजगार व उदरनिर्वाहासाठी मदत केली आहे. मदत दिलेल्या महिला स्वावलंबी बनून कुटूंबाच्या उदरनिर्वाह साठी हातभार लावत आहेत.
डॉ.पवन चांडक
अध्यक्ष एच ए आर सी संस्था परभणी

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …