जिंतूर, ता. 27 :
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी संस्थेच्या वतीने थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील एका निराधार विधवा महिलेस उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व करडू भेट देण्यात आले. यासोबतच संबंधित कुटुंबास संसारोपयोगी भांडे साहित्य, जीवनावश्यक किराणा तसेच तीन अनाथ बालिकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले.
पार्श्वभूमी पतीच्या निधनानंतर अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या श्रीमती अर्चना पुरी यांच्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन हा मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. कुटुंबाकडे स्थिर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीत राहून शेतमजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांच्या तीन मुली अनुक्रमे इयत्ता सहावी, तिसरी व पहिलीमध्ये शिक्षण घेत असून आर्थिक अडचणींमुळे शिक्षणावरही संकट आले होते.
ही बाब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुंगळाचे शिक्षक प्रकाश डूबे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने कुटुंबास भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतली व एचएआरसी संस्थेकडे मदतीसाठी प्रस्ताव मांडला.
त्यानुसार संस्थेने त्वरित निर्णय घेत कुटुंबास महिनाभर पुरेल इतके किराणा साहित्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट तसेच उदरनिर्वाहासाठी शेळी व करडू प्रदान केले. विशेष म्हणजे तीनही बालिकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने उचलली आहे.
या सामाजिक उपक्रमावेळी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन सत्यनारायण चांडक, शिक्षक प्रकाश डूबे, रवि चिद्रवार, रामप्रसाद उपाध्ये,संतोष बारबिंडे, सचिन हजारे, विष्णू जगताप आदी उपस्थित होते.
लोकसहभागातून मदत
या उपक्रमासाठी रवींद्र मुळे, सुनंदा ढाके, हार्दिक ठाकर, गुलाबराव नळगे, मुकुंद कुलथे, रामप्रसाद उपाध्ये, नंदकुमार डोंगरे आदी दात्यांनी आर्थिक सहकार्य केले. रवींद्र मुळे कुटुंबीयांनी संसारोपयोगी भांडे साहित्य दिले तर सुनंदा ढाके ताई यांनी अन्नदान प्रित्यर्थ किराणा साहित्य भेट दिले. लोकसहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे निराधार कुटुंबास आधार मिळाला असून एचएआरसी संस्थेची सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Shabdraj www.shabdraj.com