सेलू | प्रतिनिधी
सेलू शहरात रासायनिक प्रक्रियेने पिकविलेल्या केळींच्या विक्रीबाबत सखोल तपासणी करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी जिल्हाधिकारी, परभणी तसेच सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
केळी हे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडून मोठ्या प्रमाणात सेवन केले जाणारे फळ आहे. मात्र, केळी लवकर पिकविण्यासाठी काही ठिकाणी प्रतिबंधित किंवा अयोग्य रसायनांचा वापर केला जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः कॅल्शियम कार्बाइडसारख्या प्रतिबंधित पदार्थाचा वापर करून फळे पिकविणे हे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन असून, अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सेलू शहरातील केळी विक्रीची ठिकाणे, घाऊक व्यापारी, फळांची साठवणूक केंद्रे तसेच केळी पिकविण्याच्या केंद्रांची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी करावी. संशयास्पद केळींचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी. केळी पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड किंवा अन्य प्रतिबंधित पदार्थांचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यापारी व व्यक्तींवर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि लागू नियमांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
फळविक्रेते आणि घाऊक व्यापाऱ्यांना सुरक्षित व मान्यताप्राप्त पद्धतींबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करावी. तसेच या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेली तपासणी, नमुना परीक्षणाचे निष्कर्ष आणि कारवाईचा अहवाल अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडे लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय गांभीर्याने घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि अन्न सुरक्षा मानकांनुसार फळे उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागाने प्रत्यक्ष तपासणी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा डॉ. विलास मोरे यांनी व्यक्त केली आहे.
Shabdraj www.shabdraj.com