परभणी (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक शेतमजूर आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय स्वरचित ‘लोकगायिका’ कांताबाई शिंदे यांनी आई महोत्सवात गुरुवारी काव्यगायन करत सादर केलेल्या आपल्या हदयस्पर्शी गीतांनी उपस्थितांची उस्फुर्त दाद मिळवली.
मानव सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्त्रीशक्ती, मातृत्व आणि कर्तृत्ववान मातांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी परभणी शहरातील समाधान नगरात श्री राजीव गांधी विद्यालयाच्या प्रांगणात दि. २१ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित तीन दिवसीय आई महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी (दि. २१) संध्याकाळी महाराष्ट्रातील लोकप्रिय ‘लोकगायिका’ कांताबाई शिंदे यांचे “ ज्योती – साऊची पुण्याई, शिक्षण आणिले बाई” या विषयावर काव्यगायन झाले.
अध्यक्षस्थानी कृषिभूषण कांतराव देशमुख होते. याप्रसंगी व्यासपीठावर कवयित्री कांताबाई शिंदे, त्यांचा मुलगा दीपक शिंदे, समाधान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिगंबर जंगिलवाड, मराठवाडा हायस्कूलचे प्राचार्य अनंत पांडे, केशवराव भुसारे बाबा, मालनबाई गणेशराव वाघमारे, केशवराव भाऊराव भुसारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत आई महोत्सवाचे संयोजक तथा शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा.डॉ.मीनाक्षी पाटील भुसारे, रुक्मिणीताई भुसारे, भगवानराव भुसारे, डॉ.पंकज हासे, सीताताई रामजी भुसारे, मारोतराव भुसारे, विनय इंगळे, प्राचार्य शंकरराव पवार यांनी केले.
यावेळी आशाबाई प्रल्हादराव सूर्यवंशी व सुरेखा आहेरकर या कर्तृत्ववान मातांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन सुभाष ढगे व साहेब शिंदे यांनी केले.तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार शिवराज जगताप यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गायिका कांताबाई शिंदे यांचा परिचय संध्याताई फुलपगार यांनी करून दिला. प्रास्ताविक गोपाळराव भुसारे यांनी केले. सूत्रसंचलन केशव खटिंग तर आभार प्रदर्शन सोपानराव भुसारे यांनी केले.
आजच्या आधुनिक बहिणाबाई म्हणून सन्मान मिळालेल्या कांताबाई यांनी परिस्थितीवर मात करत, समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करून कलेच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कांताबाई शिंदे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्याप्रमाणेच शाळेत न जाताही, शेतात काम करताना सुचलेल्या शब्दांतून लग्न, हळद, कौटुंबिक आणि सामाजिक विषयांवर गाणी तयार केलेली असून हीच गाणी त्यांनी कुठल्याही वाद्य संगीतविना सादर केली. कधीही शाळेत न गेलेल्या आणि लिहिता-वाचता येत नसलेल्या कांताबाई यांनी आपल्या खणखणीत आवाजात लोकगीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांचा मुलगा दिपक) याने शेतातील गाणी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळाली, असे यावेळी सांगण्यात आले.
त्यांची गाणी प्रामुख्याने हळदीचे गाणे, लग्नसोहळा, शेतकऱ्यांचे प्रश्न, ओला दुष्काळ, मुलांसाठी आई-बापाचे कष्ट, बहीण – भावाचे पवित्र नाते, माय- लेकीतील जिव्हाळा, जिजाऊ पाळणा, आणि पारंपरिक सणांवर (मकर संक्रांती) आधारित असून यातील अनेक गाणी त्यांनी आई महोत्सवात सादर केली. यावेळी उपस्थित महिलांसह पुरुषांनीही त्यांच्या रचना व गायनाला टाळ्यांच्या कडकडाटात उस्फुर्त दाद दिली. आईच्या आठवणीत गायलेले ‘ बारा वर्षे झाले आई गं तुपल्या भेटीला’, ‘ आला दिवाळीचा सण अन् मला बाई माहेराला जाणं ‘ हे गाणे, तसेच सासू-सून विषयावरील ‘ सूनंच्या हाती फोन अन् पलंगावर बसती, कलयुगाची बाई रीतच उलटी दिसती’, ‘ सून म्हणी आई – बाबा आपल्यात दोन्ही कशाला ‘ ही गाणी त्यांनी गाऊन सादर केली. याशिवाय शिक्षणाचे महत्व अधोरोखित करणारी ‘ साळेत जाय रं बाळा, अडाण्याला किंमत नाई ‘, ‘ ती वेळच चुकली बाई, मी शाळेत गेले न्हाई ‘, शाळेत जाय बाळा, तुला रे शाळेचं रडू येतं ‘ ही गाणीदेखील विशेष दाद मिळवणारी ठरली. व्यसनमुक्तीवरील ‘ संसार गरिबीचा असावा, पण दारू पिणारा नवरा नसावा ‘ तसेच नऊ महिने ओझं वाहून काय रे गुन्हा केला, वृद्धाश्रमात सोडून देता शेवटी आई बापाला ‘ हे आजचे समाज वास्तव दाखवणारे गीत प्रबोधन करणारे होते. ‘ बाई काय करता सोन्याला, औक्ष माझ्या धन्याला ‘ आणि ‘ जुनं सारं गेलं आता नव्ह नव्ह आलं ‘ या गाण्यांनी कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेला. कांताबाई यांच्या गायनाला मुलगा दीपक शिंदे याच्या सूत्रसंचालनाची साथ मिळाली. कार्यक्रमास महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Shabdraj www.shabdraj.com