पाथरी,दि 15 (प्रतिनिधी)ः
सरकारचा कार्यक्रम आपला, पण अंमलबजावणी गावकऱ्यांच्या एकजुटीतून कशी साधता येते याचं उत्तम उदाहरण मानवत तालुक्यातील कोल्हावाडी गावाने घालून दिलं आहे. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि गावकऱ्यांच्या सहभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाने करण्यात आली.
गावकऱ्यांनी जवळपास ३ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून गावच्या वेशीवर व रस्त्यालगत २५० नारळ व बॉटल पाम झाडांची लागवड केली आहे. झाडांच्या संवर्धनासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली असून त्याची जबाबदारी स्थानिक युवकांकडे सोपवण्यात आली आहे. या कामासाठी कोणताही ठेकेदार, टेंडर किंवा सरकारी निधी न वापरता ग्रामस्थांनी श्रमदान, रोप खरेदी व लागवड स्वतःच्या खांद्यावर घेतली.
याच औचित्याने आदर्श शिक्षकदिगंबर भिसे यांच्यासंकल्पने तून ‘माझा गाव – माझा अभिमान’ या मोहिमेअंतर्गत ग्रामसभेत गावातील सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान झाडांची भेट देऊन करण्यात आला. यावेळी प्रा. राम भिसे, प्रा. मधुकर भिसे, पोलीस कर्मचारी गुलाब भिसे यांचा गौरव झाला. आदर्श शिक्षक दिगंबर भिसे यांनी या उपक्रमाला ‘बिनबुडाच्या गावाला आता भक्कम पाया’ मिळाल्याची घोषणा करत ग्रामस्थांना प्रेरित केले.
ग्रामपंचायत सरपंच जिजाबाई आठवे, माजी सरपंच वर्षा भिसे, ग्रामपंचायत अधिकारी मनीषा लोमटे, आदर्श शिक्षक दिगंबर भिसे, बाबासाहेब धोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गाव या अभियानासाठी झटत आहे. रस्त्यालगतची हिरवीगार झाडांची रांग फक्त सौंदर्यवर्धन करत नाही तर एकतेची ताकद व स्वबळावर विकास घडवण्याचा संदेशही देते.आज शाळा, मंदिर परिसर तसेच मसानभरी क्षेत्र झाडांनी नटले असून कोल्हावाडीचा हा प्रयोग जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्श ठरत आहे.
Shabdraj www.shabdraj.com