04/02/26
Breaking News

निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीचा १ नोव्हेंबरला विराट मोर्चा

मुंबई,दि 19 
मतदारयाद्यांत घोळ करून सत्ताधारी पक्ष निवडून आला हे सत्य आहे. मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून किंबहुना सामनानिश्चिती (मॅच फिक्सिंग) करून सत्ताधारी पक्ष जिंकत आहे. अशावेळी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. तुम्ही जर आव्हान उभे करणार असाल तर ते स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगत मनसेसह महाविकास आघाडीचा विराट मोर्चा १ नोव्हेंबर रोजी मुंबईत निघेल, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

मनसेसह महाविकास आघाडी शिष्टमंडळाने मतदार याद्यांवर असलेल्या आक्षेपासंदर्भात निवडणूक आयोगाशी चर्चा करूनही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने रस्त्यावरची लढाई लढण्याचे विरोधकांनी ठरवले आहे. त्याच दिशेने पहिले पाऊल टाकत महाराष्ट्रभरातून आघाडीतील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी १ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या मोर्चात सहभागी होतील. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून आयोगाच्या घोटाळ्याबाबत विरोधक लढाई लढतायेत. दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आमची लढाई सुरू आहे. महाराष्ट्रातही तशीच लढाई आम्ही सुरू केली आहे. लढाईतून काय निष्पन्न होईल याविषयी शंका आहे. आज मनसेचा मोठा मेळावा पार पडला. मतदान करा किंवा करू नका पण निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झाले आहे, या विरुद्ध आपली लढाई असल्याचे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या मतदान याद्यांत ९६ लाख बोगस मतदार आहेत, ते आमच्यादृष्टीने घुसखोर आहेत. त्यांना यादीतून बाहेर काढणे हे लोकशाहीसाठी गरजेचे आहे. अमित शाहांनी सांगितले की घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावे मतदान यादीतून बाहेर काढू. आमचे त्यांना आवाहन की महाराष्ट्राच्या यादीत घुसलेले १ कोटी लोकांना बाहेर काढा.
पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीर व्यासपीठांवरून सांगितले की २० हजार मतदान बाहेरून आणले. दुसरे उदाहरण म्हणजे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१ हजार बोगस आणि दुबार मतदान आहे तर बेलापूर मतदारसंघात ३५ हजार दुबार आणि बोगस मतदार आहेत. तिकडे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायलवाड यांनी सांगितले की १ लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवले गेले. याचा अर्थ बोगस मतदारांच्या जीवावर शिंदे गटाचा खासदार बुलढाण्यातून जिंकला. म्हणजेच निवडणुकीत घोटाळा करून हे लोक जिंकतात. निवडणुका पारदर्शक असायल्या हव्यात, विरोधक त्यासाठी लढतायेत. निवडणूक आयोगाकडे बैठका झाल्या. या बैठकांत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे लोक होते. सत्ताधाऱ्यांना दणका द्याव्याच लागेल, रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल. १ नोव्हेंबर रोजी शनिवारी मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल. मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक येतील. त्यांची ताकद पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दाखवून देऊ. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोर्चाचे नेतृत्व करतील.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …