04/02/26
Breaking News

आदिवासी मंत्र्याच्या निषेधार्थ तहसीलवर महादेव कोळी समाजाचा निषेध मोर्चा

पूर्णा (सुशिल कुमार दळवी) : राज्याच्या अनुसूचित जमातीत समाविष्ट असलेल्या कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी, ढोर कोळी या जमातींच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दुजाभाव केल्याचा आरोप करत आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या वतीने दि.18 डिसेंबर रोजी पूर्णा तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले त्यावेळी तहसील कार्यालया समोर आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित राज्यस्तरीय महादेव कोळी–मल्हार कोळी–टोकरे कोळी–डोंगर कोळी–ढोर कोळी संघर्ष समितीचे आयोजक दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली दि. 10 डिसेंबर रोजी नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथून हजारो आदिवासी बांधवांनी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला होता. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री असतानाही डॉ. अशोक उईके यांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारले नाही. रात्री दहा वाजेपर्यंत मोर्चेकरी ठिय्या आंदोलन करत असतानाही प्रशासनाकडून चर्चेसाठी कोणताही प्रतिनिधी पाठविण्यात आला नाही.
यामुळे निराश झालेल्या आदिवासी बांधवांनी त्याच रात्री यशवंत स्टेडियम येथे आमरण उपोषण सुरू केले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सलग चार दिवस हे उपोषण सुरू असतानाही मंत्री महोदयांनी स्वतः किंवा शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही. पोलिसांच्या दबावाखाली केवळ फोटो काढण्यासाठी औपचारिकरीत्या निवेदन स्वीकारून “मला वेळ नाही” असे सांगत आदिवासी बांधवांना नकार देण्यात आला, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
उपोषण सुरू असतानाच आपल्या खात्याची बदनामी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आंदोलनकर्त्यांवर धरपकड करण्यात आली. अनेक आदिवासी बांधवांना अमानुषपणे उचलून नेल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. आदिवासी प्रश्नांशी थेट संबंधित खात्याचे मंत्री असूनही जबाबदारी झटकत जाणीवपूर्वक दुजाभाव केल्याने आदिवासी समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत.
विशेष म्हणजे, याच कालावधीत आदिवासी विकास परिषदेच्या एका शिष्टमंडळास तात्काळ चर्चेसाठी बोलावण्यात आले आणि 12 डिसेंबरच्या मोर्चाची बैठक थेट मुख्यमंत्री महोदयांकडे लावण्याची शिफारस स्वतः आदिवासी मंत्र्यांनी केली. मात्र, त्याच खात्याशी निगडित असलेल्या कोळी समाजाच्या शिष्टमंडळास चर्चेपासून दूर ठेवत प्रश्न समजून न घेता दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप करण्यात आला.
या अन्यायकारक वागणुकीविरोधात आज पूर्णा तहसील कार्यालयासमोर तीव्र निषेध नोंदविण्यात आला. लवकरात लवकर अधिकृत बैठक घेऊन प्रश्न मार्गी न लावल्यास 23 फेब्रुवारी रोजी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आदिवासी समाजाच्या न्यायहक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. असून त्यावेळी आदिवासी महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …