हिंगोली,दि 20 (प्रतिनिधी)ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संदीप भैया माटेगावकर मित्र मंडळाच्या वतीने जवळा बाजार येथे रविवार दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात सलग तीन महिने अतिवृष्टी झाली यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा आणि एनडीआरएफ च्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 35 हजार रुपये मदत द्या, पीक विमा योजनेत केलेले बदल तात्काळ रद्द करा, गुंडा ता. वसमत येथील पुरात मृत झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये मदत द्यावी,ज्या शेतकऱ्यांचे पशुधन मयत झाले अशा शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशा मागण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. संदीप माटेगावकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लिंबाजी अंभोरे, अंगद गोपणवाड, श्रीपती लोडे, राजू चव्हाण, लक्ष्मण दशरथे आदींनी केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com