हिंगोली,दि 28 (प्रतिनिधी)
इसापूर रमणा येथील शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीरा कदम आणि धनराज कदम यांनी तातडीने वाढवे कुटुंबाची भेट घेतली.याच भेटीत मिरा कदम यांनी या कुटुंबातील शरद आणि अंकिता या दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची घोषणा केली. सेवासदनच्या माध्यमातून या लेकरांना शिक्षणासाठी बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मीरा कदम भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “आज पुन्हा एका शेतकरी भावाने आत्महत्या केली आणि एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. शेतकरी भावांनो, हात जोडून विनंती आहे, काळ कितीही कठीण असला तरी आत्महत्या करू नका. तुम्ही गेल्यानंतर तुमचा संसार उघड्यावर पडतो. ज्या पत्नीला आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, तिला एकटे सोडून जाऊ नका. लेकरांच्या आयुष्यात बाप माणूस खूप महत्त्वाचा असतो. घरात बाप नसेल तर लेकरं आत्मविश्वास गमावून बसतात. तुम्ही निघून जाता, पण तुमच्या पत्नीला मात्र त्या चिमुकल्यांसाठी अविरत संघर्ष करावा लागतो.”
“अशा कित्येक लेकरांच्या वेदना घेऊन आम्ही रोज जगत आहोत. या लेकरांच्या काळजात किती वेदना असतात हे आम्हाला विचारा. बापाची माया तर आम्ही देऊ शकत नाही, पण शिक्षणाचे बळ देऊन त्यांना उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भावांनो, आपल्या कुटुंबाला असे पोरकेपण देऊ नका,” असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत धनराज कदम यांचीही उपस्थिती होती.यावेळी संदीप नागरे,विठ्ठल चोतमल, पांडुरंग जगताप , ज्ञानेश्वर जगताप ,हनुमान जगताप , बालाजी जगताप आदी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com