सेनगाव प्रतिनिधी मोहन कांबळे
मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबर रोजी सेनगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीच्या अनुषंगाने मातंग समाज बांधव आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक सेनगाव येथे पार पडली.
या बैठकीत आगामी मोर्चाचे नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि समाजाची भूमिका यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजाची भूमिका मांडण्यासाठी तसेच मोर्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील बांधवांनी एकत्रित येऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याबाबतही चर्चा झाली.
१३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध पदाधिकारी आणि प्रतिनिधींशी समन्वय साधून पुढील नियोजन करण्यावर भर देण्यात आला. आरक्षणाचे न्याय्य वाटप व्हावे आणि समाजाच्या मागण्यांना योग्य न्याय मिळावा, या भूमिकेतून मोर्चाच्या तयारीला गती देण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
Shabdraj www.shabdraj.com