04/02/26
Breaking News

आता झेडपीत 5, पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य,बावनकुळे यांची मागणी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायद्यात बदल करून जिल्हा परिषदेत 5 व पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची मागणी केली आहे. बावनकुळे यांची ही मागणी सभागृहातील पक्षीय संख्याबळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

झेडपीत 5, पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य हवेत

चंद्रशेखर बावनकुळे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. तिथे पत्रकारांशी संक्षिप्त संवाद साधताना त्यांनी वरील मागणी केली. ते म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ज्या पद्धतीने महापालिका, नगरपालिकेत स्वीकृत सदस्य असतात, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्य असले पाहिजे आणि पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य असले पाहिजेत. ज्याला आपण कोऑप म्हणतो. त्यानुसार मी कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली. मला विश्वास आहे की, मुख्यमंत्री अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्य व पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य नेमण्याची माझी मागणी करतील, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढल्यास अनेक इच्छुकांना संधी मिळणार नाही. त्यातच, पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते आणि पात्र उमेदवार संधी मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून ही सोय करण्यात येत असल्याचे दिसून येते. यापूर्वी नगरपालिका, महापालिकांमध्ये संख्याबळाच्या आधारे स्वीकृत सदस्य घेतले जात आहेत. आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची नेमणूक झाल्यास अनेकांना संधी मिळू शकते.

 

Check Also

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांकडून मोठा खुलासा…

मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता …