राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.
निवडणुकांचे निकाल जाहीर करण्याबाबतही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात म्हटलं होतं. की औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एका निवडणुकीचा निकाल दुसऱ्या निवडणुकीवर प्रभाव टाकू नये, यासाठी काही वेळा निकाल राखून ठेवले जातात. राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर झाल्यास उर्वरित निवडणुकांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे घ्याव्यात, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली होती.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आधीच तयारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वतयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना निवडणूक वेळेत घेण्यासाठी आदेश दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आलंय.
Shabdraj www.shabdraj.com