05/02/26
Breaking News

आर्थिक परिस्थितीवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी

रवळगाव येथील आरती जगन्नाथराव रोडगे, भौतिकशास्त्र विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम

सेलू / नारायण पाटील – तालुक्यातील रवळगाव येथील विद्यार्थिनी कु. आरती जगन्नाथराव रोडगे हिने ,अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जात, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम एस सी फिजिक्स म्हणजेच , भौतिकशास्त्र विषयात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली ,असेच म्हणावे लागेल.

तालुक्यातील, सेलू पासून पाच किलोमीटर अंतरावर रवळगाव आहे. मात्र येथील मुले …मुली पहाटे चार वाजल्यापासून सायकल द्वारे आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करतात.गावापासून सायकल वरून सुरू झालेला हा प्रवास ,अनेक विद्यार्थ्यांना लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहचविणारा ठरला आहे. रवळगाव येथील अनेक विद्यार्थी वर्ग एक व वर्ग दोन म्हणजेच जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक उपजिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच तत्सम पदापर्यंत पोहोचलेले आहेत. हाच आदर्श उराशी बाळगून तेथील इतर विद्यार्थ्यांची देखील वाटचाल याच मार्गावर सुरू आहे. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली कु. आरती जगन्नाथराव रोडगे, हिचे शैक्षणिक जीवन कायम आर्थिक संघर्षात अडकलेले होते. अशाही परिस्थितीत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत शिक्षणातील ध्येय व स्वप्न गाठण्यासाठी काटेरी रस्त्यावरून प्रवास सुरूच होता. रवळगाव येथून सायकल द्वारे दहावी व पदवीपर्यंतचे शिक्षण सेलू येथे पूर्ण केल्यानंतर ,पुढील उच्च शिक्षणासाठी केवळ आर्थिक अडचणीमुळे या विद्यार्थिनीने एक वर्ष घरी बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुठलाही बाऊ न करता ते एक वर्ष मागे टाकत, पुन्हा एकदा उच्च शिक्षणासाठी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एम एस सी भौतिकशास्त्र या विषयासाठी प्रवेश घेतला. आणि कठीण परिश्रम करून संपूर्ण विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला .आर्थिक परिस्थितीवर मात करणाऱ्या कु. आरती रोडगे या विद्यार्थिनीस ईश्वराने देखील सुवर्णपदक पदक देऊन भविष्यकाळ सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा संकेतच दिला आहे.

 

घरची कौटुंबिक परिस्थिती अतिशय नाजूक, कु. आरती चे वडील जगन्नाथ रोडगे चार चाकी वाहन चालवून कुटुंबाची उपजीविका भागवतात. तर आई गृहणी आहे. अशा कुटुंबातून परिस्थितीचे कोणताही बाऊ न करता, जिद्दीने व चिकाटीने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड मेहनत करून, आरती रोडगे हीने ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा स्थापना दिन तथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी सदरील विद्यार्थिनीला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते परभणी येथे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.तर शनिवार २० सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच कुलगुरू मनोहर चासकर, प्र .प्र.कुलगुरू अशोक महाजन यांच्या उपस्थितीत सुवर्णपदक व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.संपूर्ण यशात आई वडील , भाऊ व रवळगाव येथील गावकरी मंडळी , तसेच सेलू व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील गुरुजन यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे .तीच्या यशस्वी भरारीमुळे परिसरात सर्वत्र आनंद व्यक्त होताना दिसत आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …