मुंबई : जर तुमच्याकडं पॅन कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्राप्तिकर विभागानं सर्व पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन आधार कार्डाशी तात्काळ लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर 2025 नंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. अनेक करदात्यांना अजूनही ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. लिंकिंग न केल्यास 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल, तर काही विशिष्ट प्रकरणांमध्ये दंड माफ आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास कर परतावा, टीडीएस आणि इतर आर्थिक व्यवहारांवर परिणाम होईल. त्यामुळं आजच तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करायला हवं.
आधार-पॅन लिंकिंगची मुदत आणि दंड
प्राप्तिकर विभागाच्या एप्रिल 2025 च्या अधिसूचनेनुसार, 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी आधार एनरोलमेंट आयडीच्या आधारे पॅन मिळवलेल्या व्यक्तींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार क्रमांकासह लिंकिंग पूर्ण करावे लागेल. ही मुदत चुकल्यास 1 जानेवारी 2026 पासून पॅन निष्क्रिय होईल. मात्र, 1 ऑक्टोबर 2024 नंतर आधार एनरोलमेंट आयडीनं पॅन मिळवलेल्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत दंडमुक्त लिंकिंग करता येईल. इतर प्रकरणांमध्ये लिंकिंगसाठी 1000 रुपयांचा विलंब शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ई-पे टॅक्सद्वारे भरता येतं.
पॅन आधारशी कसं लिंक करावं? (How to link PAN with Aadhaar)
ही प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन आहे. खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचं कार्ड आधारशी लिंक करू शकता.
1. प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर जा.(www.incometax.gov.in/iec/foportal/)
2. ‘क्विक लिंक्स’ सेक्शनमध्ये ‘लिंक आधार’ ऑप्शन क्लिक करा.
3. तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका, नंतर ‘व्हॅलिडेट’ क्लिक करा.
4. जर पूर्वी लिंक असेल, तर संदेश दिसेल. अन्यथा, दंड भरला असल्यास पेमेंट व्हॅलिडेट होईल.
5. आवश्यक तपशील भरून ‘लिंक आधार’ क्लिक करा.
6. आधारशी नोंदणीकृत मोबाईलवर आलेला 6 अंकी ओटीपी टाका
7. रिक्वेस्ट सबमिट करा.
लिंकिंगला 4-5 दिवस लागू शकतात. एसएमएसद्वारेही लिंकिंग शक्य आहे: UIDPAN <12 अंकी आधार> <10अंकी पॅन> हे 567678 किंवा 56161 वर पाठवा.
लिंकिंग न केल्यास काय होईल?
31 डिसेंबर 2025 पर्यंत लिंकिंग न केल्यास पॅन निष्क्रिय होईल.
कर परतावा (रिफंड) मिळणार नाही किंवा त्यावर व्याज मिळणार नाही.
टीडीएस किंवा टीसीएस उच्च दरानं कपात होईल (कलम 206ए आणि 206सीसी नुसार).
आयकर रिटर्न फाइलिंग, प्रक्रिया किंवा इतर कर-संबंधित कामं थांबतील.
बँकिंग, गुंतवणूक किंवा मोठ्या व्यवहारांमध्ये अडथळे येतील.
निष्क्रिय पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठीही 1000 रुपये दंड लागेल.
ही मुदत चुकवू नका, कारण याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक व्यवहारांवर होईल. आत्ताच लिंकिंग पूर्ण करा आणि दंड टाळा. प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर स्टेटस तपासून पहा की तुमचं पॅन आधारशी लिंक आहे की नाही.
Shabdraj www.shabdraj.com