27/04/26
Breaking News

गंगाखेडमध्ये परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

गंगाखेड | प्रतिनिधी :
गंगाखेड शहरात श्री भगवान परशुराम जयंती तसेच महात्मा बसवेश्वर जयंती हे दोन्ही उत्सव मोठ्या भक्तिभावात, सामाजिक जाणीवेतून व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, जयघोष, भजन-कीर्तन आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
परशुराम जयंती – भव्य शोभायात्रा व धार्मिक सोहळा
श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त काल सायंकाळी ५ वाजता कुंदेश्वर मंदिर परिसरातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. ही शोभायात्रा भगवती चौक, श्रीराम चौक, डॉ. लेन, श्री भगवान परशुराम चौक, गीता मंडळ आदी प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. ढोल-ताशे, बँड पथक, पारंपरिक वेशभूषा, महिला भजनी मंडळ तसेच विविध सामाजिक व धार्मिक मंडळांच्या सहभागामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
या सोहळ्यास यज्ञमहर्षी श्री यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज, वेदाचार्य श्री रामचंद्र महाराज टाकळकर, ह.भ.प. श्री चैतन्य महाराज कंधारकर, ह.भ.प. श्री माणिक शास्त्री नाव्हेकर, ह.भ.प. श्री बाळुमहाराज नाव्हेकर, वै.शा.सं. नारायण गुरुजी यांच्यासह परिसरातील अनेक संत-महंतांची उपस्थिती लाभली.
शोभायात्रेनंतर संत-महंतांच्या हस्ते श्री भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत संपूर्ण कार्यक्रम शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
बसवेश्वर जयंती – समाजप्रबोधन व सेवाभाव
दरम्यान, महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त गंगाखेड येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. नगरेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सायंकाळी निळकंठेश्वर मंदिर व सरस्वती विद्यालय मैदान येथून ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महिलांची लक्षणीय उपस्थिती या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच परशुराम जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत करून सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.
रात्री पू. ब्र. श्री १०८ सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज (साखरखेर्डा) यांनी आपल्या प्रवचनात “साधूच्या लक्षणात इतिहास असतो. आचरण आणि विचार यांत सुसंगती असणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन करत व्यसनमुक्ती, सामाजिक एकजूट व महापुरुषांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला.
चौकट : शोभायात्रा मार्गावर सेवाभाव
शोभायात्रा मार्गावर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, शरबत व शीतपेयांची सोय करण्यात आली. मराठा मंदिर परिसरात माजी नगरसेवक सुनील चौधरी यांच्या वतीने शरबत व शीतपेयांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते ॲड. मिथिलेश केंद्रे, पप्पु मुंडे, अनिल चौधरी उपस्थित होते.
भगवती मंदिराजवळ वैभव साडी सेंटरसमोर श्री रामजन्मोत्सव समितीच्या वतीने कैरीचे पन्हे वाटप करण्यात आले. शोभायात्रा समारोप स्थळी माजी नगरसेवक दीपक तापडिया यांच्या वतीने आइस्क्रीम वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मकरंद चिनके, लक्ष्मीकांत जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश बोरीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल दीवान यांनी मानले.

Check Also

“शाम ए सरगम” संगीत पारिवाराचा वर्धापनदिन साजरा

सेलु,दि 26 ः सेलू येथील प्रख्यात “शाम ए सरगम” संगीत परिवाराने दि. 24 एप्रिल 2026 …