18/07/26
Breaking News

परभणी पोलिसांची मोठी कारवाई; 116 गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवण्यात यश

परभणी, दि. 28 – परभणी जिल्हा पोलीस दलाने धडक कारवाई करत तब्बल 116 गोवंशीय जनावरांची सुटका करून त्यांना जीवदान दिले आहे. नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील नांदखेडा रोडवरील बायपासजवळील शेत परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही व्यक्तींनी ग्रीन शेड उभारून गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी त्यांना एकत्र केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नानलपेठ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त छापा टाकला.

या कारवाईत कत्तलीसाठी आणलेल्या 116 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. यात 2 गायी, 1 वासरू आणि 113 बैलांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना नानलपेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली.

त्यानंतर पशुवैद्यकीय रुग्णालयात सर्व जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढे ही जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने सेलू येथील श्री संत गोविंदरामजी (संत गोविंद बाबा) दादपंथी मठ व गोशाळेत 12 वाहनांच्या माध्यमातून पाठविण्यात आली.या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …