17/07/26
Breaking News

राज्यराणी एक्स्प्रेसच्या ए.सी. डब्यात प्रवासी दाम्पत्याची लूट

७० हजारांचा मुद्देमाल लंपास; पुर्णा रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा कुचकामी
लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

पुर्णा / सुशील कुमार दळवी – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, मोठे दावे आणि गाजावाजा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. मुंबई–नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित (ए.सी.) डब्यात थेट चोरीचा प्रकार घडूनही रेल्वे सुरक्षा बल (RPF) व लोहमार्ग पोलिसांना चोरट्यांचा मागमूस लागू शकलेला नाही. या घटनेत ए.सी. कोचमधील प्रवासी दाम्पत्याकडील सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला गेला असून, पुर्णा रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

मुंबई येथून राज्यराणी एक्स्प्रेसच्या कोच बी-३, बर्थ क्रमांक ३३ व ३४ वरून प्रवास करणारे अरुण गणेशराव हट्टेकर (वय ४२, रा. सफाळे, ता. जि. पालघर) हे पत्नीसमवेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून नांदेडकडे जात होते. शनिवारी पहाटे ५ ते साडे५ वाजण्याच्या सुमारास, परभणी स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ते झोपेत असताना त्यांची ब्राऊन रंगाची लेदर बॅग लंपास केली. पुर्णा रेल्वे स्थानकावर गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

चोरी गेलेल्या बॅगेत आयफोन (अंदाजे किंमत ५० हजार रुपये), २० हजार रुपये रोख, तसेच एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. विशेष म्हणजे, चोरटे पुर्णा रेल्वे स्थानकावरच डब्यातून उतरले असावेत, असा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

पुर्णा रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही, गस्त व सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच केला जातो. मात्र प्रत्यक्षात ए.सी. डब्यात घुसून चोरी होऊनही कोणालाही संशय न येणे, हे सुरक्षा यंत्रणेच्या ढिसाळपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

 

या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२१/२०२६, कलम ३०५ (क) भारतीय न्याय संहितेनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

दरम्यान, “ए.सी. कोच सुरक्षित असतो” हा प्रवाशांचा समज आता पूर्णतः चुकीचा ठरत आहे. प्रवासी झोपेत असताना चोर निर्भयपणे चोरी करून पसार होतात आणि रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस केवळ गुन्हा नोंदविण्यापुरतेच मर्यादित राहतात, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांतून उमटत आहे.

 

पुर्णा रेल्वे स्थानक चोरांसाठी ‘सुरक्षित’ ठिकाण ठरत आहे का?
पुर्णा रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या तसेच प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा रक्षकांचा अभाव यामुळे चोरीचे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे. सुरक्षा रक्षकांच्या कामातील कुचकामीपणा व निष्काळजीपणामुळे हे स्थानक चोरांसाठी सुरक्षित ठिकाण बनत आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही फुटेज, गस्तीतील त्रुटी व जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका यांची सखोल चौकशी होणार की, हे प्रकरण पुन्हा एकदा थंड बस्त्यात जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा खेळ मांडणाऱ्या रेल्वे प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …