परभणी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व समाज कल्याण कार्यालयाच्या संयुक्त सहकार्याने क्रीडागंण विकास अनुदान योजना व व्यायामशाळा विकास अनुदान योजना (विशेषतः अनुसूचित जाती घटकासाठी) राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी दि. 14 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनांचा उद्देश नागरिकांमध्ये नियमित व्यायाम व फिटनेसची सवय लावणे, लठ्ठपणाविरुद्ध लढा देणे व संतुलित जीवनशैलीला चालना देणे असा असून, निरोगी राष्ट्रनिर्मितीसाठी क्रीडा आणि शारीरिक व्यायामाचा प्रसार करणे हाच यामागील मुख्य हेतू आहे. विशेषतः अनुसूचित जातीतील दुर्बल घटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत तसेच शासकीय व निमशासकीय संस्था या योजना लागू होण्यास पात्र आहेत. मात्र, अशा संस्था पाच वर्षांपूर्वी 100 टक्के शासकीय अनुदानित असणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी क्रीडागंण विकास योजनेसाठी सुयश नाटकर (९७६३९९४८४६) तर व्यायामशाळा विकास योजनेसाठी रोहन औंढेकर (८९९९३३७९२९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या दोन्ही योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील संस्था, शाळा, पंचायत संस्था व इतर पात्र घटकांनी प्रस्ताव तयार करून निश्चित मुदतीपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com