परभणी,दि 19 ः
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आज समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, या विरोधात संघटनेने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आंदोलन केले.
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतीकांचा सन्मान राखत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या अपमानास जबाबदार असणाऱ्यांना तत्काळ माफी मागण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले की, “जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर हे सर्व समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख केल्याने संपूर्ण लिंगायत समाजात नाराजी आहे. ही केवळ चूक नसून समाजाच्या श्रद्धेला ठेच देणारे वर्तन आहे.”
संघटनेने इशारा दिला की, मंत्री शिरसाट यांनी जर लवकरात लवकर जाहीर माफी मागितली नाही, तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर,
शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे, संभाजी शेवटे, मयूर पेटे, शिवा दामोदर, मनोहर मोपकर आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com