04/02/26
Breaking News

पाथरी मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

परभणी,दि.24(प्रतिनिधी) : पाथरी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त नागरिक व शेतकर्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आर्थिक मदत देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
21 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथरी, सोनपेठ व मानवत तालुक्यांतील विविध महसूल मंडळांत अतोनात नुकसान झाले. केवळ तीन तासांत कासापुरी मंडळात 215 मिमी, हदगाव 106 मिमी, बाभळगाव 98 मिमी, सोनपेठ 136 मिमी, तर केकरजवळा परिसरात 98 मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद झाली.
ढगफुटी सदृश पावसामुळे हदगाव बु., बाभळगाव व कासापुरी येथील घरांमध्ये पाणी शिरले. हदगावमधील इंदिरानगर वसाहतीत दोन्ही नाल्यांना आलेल्या पुरामुळे 100 हून अधिक घरांचे नुकसान झाले. शाळा, अंगणवाड्या आणि रस्ते पाण्याखाली गेले, तर घरातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले. महसूल व पोलिस प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू करून काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. सोनपेठ व केकरजवळा महसूल मंडळातील दिघोळ, नरवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये कापूस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाच्या रोपांचे मूळ कुजण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पीडित शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदतीची मागणी केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरध्वनीद्वारे विभागीय आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …