पाथरी,दि 03 (प्रतिनिधी)ः
जिल्ह्यातील मातब्बर लोकनेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी त्यांची चर्चा झाली असून येत्या सात तारखेला प्रवेश होईल असे कार्यकर्त्याकडून सांगण्यात येत आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने त्यांची जागा भरून काढण्यासाठी बाबाजानी यांचा हा संभाव्य काँग्रेस प्रवेश असल्याचे मानले जात आहे.कार्यकर्त्यांनी देखील तसा आग्रह धरल्याने आगामी राजकारण चांगलेच रंगणार आहे.
पाथरी मतदार संघासह जिल्हा परिषदेवर दुर्राणी यांची चांगली पकड आहे.पाथरी नगर पालीका,पंचायत समिती,जिल्हा परिषद,बाजार समिती,जिल्हा बॅंक आदीवर दुर्राणी यांचा वरचष्मा आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे.सर्वांशी समनव्य ठेवुन काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.शरद पवार यांचे विश्वासु म्हणून राज्यात त्यांची ओळख आहे.१९८० पासून शरद पवारांसोबत असलेले बाबाजानी त्या वेळच्या एस. काँग्रेसमध्येही होते. चरख्याच्या चिन्हावर त्याकाळी मराठवाड्यात पाथरी, परतुर आणि धाराशिव या तीन नगरपरिषदा निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर परभणीचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून बाबाजानी यांनीच जबाबदारी पार पाडली होती. अगदी अलीकडेपर्यंत ते या पक्षाचे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष राहिले. पाथरी नगरपालिकेवर त्यांचे गेली अनेक दशके एकहाती वर्चस्व राहिले आहे.
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बराच काळ शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले होते. पुढे त्यांनी अजीत पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते या पक्षाचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यानंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगरात झालेल्या एका कार्यक्रमात बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा अजीत पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
तीन वेळा विधीमंडळात
पाथरी या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००४ ते २००९ या काळात प्रतिनिधित्व केले. त्यानंतर दोन वेळा ते विधान परिषदेवर आमदार होते.
२०१२ ते २०१८ या काळात परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना आमदारकीची संधी मिळाली आणि दुसऱ्यांदा ते २०१८ साली पुन्हा राष्ट्रवादीच्या कोट्यातून बिनविरोध आमदार झाले होते. अशाप्रकारे बाबाजानी यांना विधिमंडळात तीन वेळा संधी मिळालेली आहे.
अपक्ष निवडणूक लढवली
बाबाजानी यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत असतानाच त्यांचे आणखी एक स्थानिक राजकिय विरोधक राजेश विटेकर यांना पक्षाने विधान परिषदेची संधी दिली त्यामुळेही बाबाजानी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटात अस्वस्थ होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा पाथरी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. याच निवडणुकीत एकाच वेळी तीन विरोधकांशी त्यांनी चांगलाच लढा दिला.चौरंगी लढतीत निवडणुकीत विटेकर विजयी झाले.
मागच्या जून महिन्यात त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही ठरली होती. मात्र त्यांच्या या प्रवेशात अडसर निर्माण झाला. त्यामुळे गेल्या काही महिन्यात राजकीयदृष्ट्या ते कमालीचे अस्वस्थ होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून दोर कापलेले आणि अजीत पवारांच्या राष्ट्रवादीतला प्रवेश रखडलेला अशा परिस्थितीत अधिक काळ घालवण्यापेक्षा बाबाजानी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडूनही सांगितले जात आहे.अलीकडेच माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये जाऊन वरपूडकरांची जागा घेण्याचा बाबाजानी यांचा मानस आहे. वरपूडकर भारतीय जनता पक्षात गेल्याने काँग्रेसलाही एका मोठ्या राजकीय चेहऱ्याची गरज आहे. बाबाजानी ती उणीव भरून काढू शकतात. त्या दृष्टीने काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी तर त्यांची चर्चा झालीच पण वरिष्ठ पातळीवरूनही काँग्रेस नेतृत्वाशी त्यांची बोलणी सुरू आहे.
महापालीकेच्या राजकारणावर परिणाम
दुर्राणी हे कॉंग्रेसमध्ये आल्यास महापालीका निवडणुकीत कॉंग्रेसला मोठे यश मिळु शकते असा अंदाज बांधला जात आहे.परभणीत त्यांना माननारा मोठा वर्ग आहे.त्यामुळे कॉंग्रेस त्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.त्यासोबत जिल्हा परिषद,नगरपालीका या निवडणुकीत देखील दुर्राणी यांचा करिष्मा पाहयला मिळेल.
Shabdraj www.shabdraj.com