सेलू(प्रतिनिधी )
वेदनेची कळ मारण्यासाठी पूर्वीच्या काळी जुनी लोकं चटका देत असत, तसेच ग्रामीण साहित्य हे सुद्धा ग्रामीण भागातील लोकांच्या वेदनेची कळ मारण्यासाठीच असल्याचं प्रतिपादन लेखक आसाराम लोमटे यांनी केले.
साहित्य अकादमी, दिल्ली व सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा. शाळा रायपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रामालोक” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी उदय जाधव, गट शिक्षण अधिकारी गजानन वाघमारे, डॉ. राजाराम झोडगे, डॉ. राजेंद्र गहाळ, बबन आव्हाड, नाट्यलेखक त्र्यंबक वडसकर, सुरेश हिवाळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना लोमटे म्हणाले की, शेतकऱ्याच्या, ग्रामीण भागातील महिलेच्या जगण्याला दुःखाची कायम एक किनार आहे. जुनी माणसं भविष्याचा विचार करून जगायची, त्यामुळे त्यांना शिकवण्याची गरज नाही तर पुढच्या पिढ्यांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. शेतकऱ्यांचं, ग्रामीण महिलांच्या दुःखाचं प्रतिबिंब ग्रामीण साहित्यात दिसून येतं. हेच अस्सल ग्रामीण साहित्य शेवटच्या घटकापर्यंत रुजावं, ग्रामीण भागातील वाचनसंस्कृती, लेखन अधिकाधिक प्रगल्भ आणि कसदार होण्यासाठी साहित्यविषयक कार्यक्रम गावोगावी होणे गरजेचे आहे. रायपूर गावाने ती परंपरा जोपासली आहे. म्हणूनच साहित्य अकादमीसारखी राष्ट्रीय संस्था साहित्याचा जागर घडवण्यासाठी रायपूरसारख्या गावाचा विचार करते ही अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी त्र्यंबक वडसकर, बबन आव्हाड, सुरेश हिवाळे यांनी कविता तर डॉ राजाराम झोडगे, डॉ राजेंद्र गहाळ यांनी कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण गाडेकर, प्रास्ताविक माधव गव्हाणे तर आभार दादासाहेब गाडेकर यांनी मानले. यावेळी रायपूरचे सरपंच आश्रोबा हिंगे, उपसरपंच बापूराव गाडेकर, भागवत गाडेकर,गणपतराव गाडेकर, सर्जेराव लहाने, माणिक पुरी, प्रा. अनंत मोगल, डासाळा सरपंच दादासाहेब बोंबले, प्रा. नितीन लोहट, डॉ. शरद ठाकर, विजय ढाकणे, रामराव बोबडे, राम गायकवाड,बाळू बुधवंत, के. सी. घुगे, जिंतूर, सेलू, पुनमचंद खोना ,पांडुरंग पाटणकर,पांडुरंग मुसळे,डॉ. रमेश बोराडे आणि परभणी येथील अनेक साहित्य प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग गाडेकर,आप्पासाहेब गाडेकर,बाबासाहेब गाडेकर,विष्णुपंत गाडेकर जिजाभाऊ हिंगे तसेच शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.
Shabdraj www.shabdraj.com