23/11/26
Breaking News

अडलेल्या गाईची केली सुरक्षित प्रसूती,परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील चमुच्या प्रयत्नांना यश

परभणी : गाईची नैसर्गिक प्रसूती अडकल्याच्या गंभीर परिस्थितीत योग्य व तत्काळ निर्णय घेत शुक्रवारी (दि.२) रात्री नऊच्या सुमारास परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशु चिकित्सालयात दाखल झालेल्या गाईची सुरक्षित प्रसूती करण्यात पशुवैद्यक चमूला यश मिळाले. आता गाईसह वासराची प्रकृती चांगली आहे.
जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वांगी येथे डॉ.राजेश चौधरी स्वखर्चाने चालवत असलेल्या शताक्षी गोशाळेत दीड वर्षापूर्वी कुणीतरी आणून सोडलेल्या गाईचे शुक्रवारी दुपारी दिवस भरल्याने ती वेदनांनी कळा देत होती. मात्र स्थानिक पातळीवर काहीच करता येत नसल्याने डॉ.चौधरी यांनी वांगी गावचे गोसेवक शिवदास पोतलवाड, अंकुश सरोदे, मुंजाजी पोतलवाड व अंकुश कदम यांच्या मदतीने त्या गाईला एका वाहनातून परभणी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयात नेले. रात्री उशिरा महाविद्यालयात पोहोचल्याने आणि महात्मा गांधी जयंतीची सुटी असल्याने दवाखाना बंद असूनही पशुवैद्यक तज्ञांची टीम दवाखान्यात गायीच्या उपचारासाठी उपस्थित झाली. पशु प्रजनन व प्रसूती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.मंजुषा पाटील, पशु औषधी वैद्यक शास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ.पंकज हासे हे पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी लगेच तिथे पोहोचले.
गाईचा गाभण काळ पूर्ण झालेला होता. परंतु गाई कडून ती नैसर्गिक प्रसुती होऊ शकत नव्हती. गाईने जास्त कळा दिल्यामुळे मायांग बाहेर पडले होते. त्यामुळे कष्ट प्रसूतीची शक्यता जास्त वाढली होती. अशा परिस्थितीमध्ये गायीच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे पशुवैद्यक तज्ञांनी त्या गाईचे त्वरित सीझर करण्याचा निर्णय घेतला. सिझर नंतर गाय आणि वासरू दोघेही सुरक्षित राहिले. सिझर करून एक जिवंत कालवड बाहेर काढण्यात आली. ही सिझरची गुंतागुंतीची प्रक्रिया शुक्रवारी रात्री 11 वाजता करण्यात आली. आता गाय व वासरू एकदम व्यवस्थित आहे.

पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशु प्रजनन व प्रसूती शास्त्र विभागाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम. व्ही. एस.सी.) चे विद्यार्थी डॉ.गुरुनाथ बेरूले, डॉ.सुरज अंभुरे, डॉ.यश गायकवाड, डॉ.गौरव सूर्यवंशी, डॉ.सुरज व्हनमाने तसेच पदवीचे विद्यार्थी रमाकांत कागेरू, केदार नूच्चे, अर्जुन घोळवे, बसवेश्वर हेन्ते, रवी माळी, संभाजी डाके यांच्या पथकाने सहयोगी अधिष्ठाता तथा पशु चिकित्सालयाचे संचालक डॉ.विश्वास साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पशु प्रजनन व प्रसूती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.मंजुषा पाटील, पशु औषधी वैद्यक शास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ.पंकज हासे यांच्या नेतृत्वात गाईचे सिझेरियन करण्यात आले.

Check Also

बँकेच्या ऑनलाईन घोळात शेतकरी कर्जमाफी पासून वंचित, जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार

सेलू (प्रतिनिधी ) बँकेकडून करण्यात आलेल्या ऑनलाईन च्या घोळात सेलू येथील शेतकरी बापूसाहेब रामराव शेरे …