सेलू / प्रतिनिधी – “श्यामची आई ” पुस्तक म्हणजे साने गुरुजींचा जीवन प्रवास असून मराठी साहित्यातील मैलाचा दगड असल्याचे विचार सहशिक्षिका मंजुषा बोराडे यांनी एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले .
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने साने गुरुजी यांच्या जयंती निमिताने आयोजित” एक दिवस एक पुस्तक” या उपक्रमात साने गुरुजी लिखित ” श्यामची आई ” या पुस्तकाच्या चर्चा कार्यक्रमाचे आयोजन दि २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले होते .
स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डासाला येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांची उपस्थिती होती .तर वक्त्या म्हणून न्यू हायस्कुल शाळेतील सहशिक्षिका मंजुषा बोराडे यांची उपस्थिती होती .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या मासिक उपक्रमाचे हे ३५ वे पुष्प या उपक्रमाचा आदर्श घेऊन आता जिल्हाभरात ही चळवळ सुरू झाली आहे .हेच या उपक्रमाचे यश असल्याचे कवी सुरेश हिवाळे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले .
सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण मिळाल्याबद्दल गौतम सूर्यवंशी ,राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सुरेश हिवाळे व राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पांडुरंग पाटवकर यांचा देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
यावेळी बोलतांना बोराडे पुढे म्हणाल्या की , श्यामची आई हे पुस्तक मराठी साहित्यातील अजरामर कलाकृती असून साने गुरुजींनी आपल्या आईच्या आठवणीतून लिहलेली एक हृदयस्पर्शी ,आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे .ज्यात आईचे निस्सीम प्रेम,त्याग आणी नैतिक मूल्यांची शिकवण साध्या व सरळ भाषेतून मांडली आहे .व त्यामुळेच हे पुस्तक वाचकांच्या मनावर पिढ्यानपिढ्या राज्य करीत आहे .
मातृत्व व मूल्यांची जपवणूक करणारा श्यामची आई हा एकमेव ग्रंथ आहे .त्यातील संस्कार हे शब्दात आणि पुस्तकात लिखित होऊच शकत नाहीत .असे विचार अध्यक्षीय समारोपात मधुकर काष्टे यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्रपाली खाजेकर यांनी केले तर पांडुरंग पाटवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .
यावेळी प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक , पत्रकार व महिला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Shabdraj www.shabdraj.com