परभणी, दि. 29 ः
माळशेज डोंगर रांगेच्या कुशीत विसावलेल्या, चौदाशे चोवीस मीटर उंचीवरील हरिश्चंद्रगड आणि प्रसिद्ध कोकणकड्यावर परभणीतील संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या ट्रेकर्सनी यशस्वी चढाई केली. शुक्रवार दुपारी १२ वाजता सुरुवात करून पावसाच्या सरी, जोरदार वाऱ्याचा मुकाबला करत त्यांनी अवघ्या अडीच तासात कोकणकड्यावर पोहोचत पराक्रम गाजवला.
ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला हा अजस्त्र गड इतिहास, पुराणकथा आणि निसर्ग यांचं अनोखं संमेलन मानला जातो. किल्ल्याच्या परिसरात असलेल्या प्राचीन लेण्या, शिलालेख, मंदिरे आणि नैसर्गिक देखाव्यामुळे ट्रेकर्ससाठी हा परिसर एक पर्वणी मानला जातो. हरिश्चंद्रगडाचा उल्लेख अग्निपुराण आणि मच्छपुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो. योगीराज संत चांगदेव यांची तपश्चर्या याच गडावर झाली होती, तर राजा हरिश्चंद्राशी संबंधित आख्यायिका गडाच्या ऐतिहासिकतेला अधोरेखित करतात. यामुळेच हा गड ट्रेकिंगप्रेमींच्या मनात एक खास स्थान राखून आहे. या मोहिमेदरम्यान सर्पमित्र चेतन लांडे, विलास साखरे, श्यामसुंदर निरस, प्रताप खवले या ट्रेकर्सनी निसर्गाच्या आव्हानांवर मात करत डोंगररांगांमधून मार्ग काढला. या ट्रेकदरम्यान मधूनच कोसळणारा पाऊस, गडद धुके आणि खडतर चढण यामुळे थरार अधिक वाढला. मात्र, त्यांचं ध्येय, जिद्द आणि निसर्गाविषयीची ओढ या सगळ्यांवर मात करून त्यांनी यश मिळवलं.
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यापासून सुरु झालेला हा प्रवास केवळ शारीरिक क्षमता नव्हे तर मानसिक चिकाटीचीही परीक्षा ठरली. संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या ट्रेकर्सनी दाखवलेली धैर्य आणि सहकार्याचे कौतुक होत आहे.गडावरून दिसणारा कोकणकड्याचा नजारा, ढगांच्या पल्याड पसरणारी घाटमाथ्यांची सौंदर्यदृष्ये आणि निसर्गाशी मिळालेला संवाद या ट्रेकच्या आठवणी अविस्मरणीय ठरल्या आहेत. परभणीतील ट्रेकिंग चळवळीला गती देणारा आणि नव्या ट्रेकर्सना प्रेरणा देणारा हा अनुभव ठरला आहे.
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यापासून सुरु झालेला हा प्रवास केवळ शारीरिक क्षमता नव्हे तर मानसिक चिकाटीचीही परीक्षा ठरली
श्यामसुंदर निरस,अध्यक्ष-:संकल्प स्वराज्य ऊभारणी फाउंडेशन
Shabdraj www.shabdraj.com