गंगाखेड,दि 19 (प्रतिनिधी)ः
जालना येथे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या शालेय विभागीय कराटे स्पर्धेत गंगाखेड येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाने पुन्हा एकदा कामगिरी करत आपला क्रीडा वर्चस्वाचा ठसा उमटवला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तंत्र, जिद्द आणि निर्धाराच्या जोरावर पदकांची लूट करत महाविद्यालयाला मानाचा मुकुट मिळवून दिला.
स्पर्धेत तनुजा खोडके हिने दमदार प्रदर्शन करत फायनलपर्यंत वाटचाल केली व रौप्य पदकावर (सिल्वर मेडल) नाव कोरले. तिच्या या कामगिरीने संपूर्ण महाविद्यालयाचा गौरव वाढवला. तर श्रेया सूर्यवंशी आणि शिवम दराडे यांनी आपल्या-आपल्या वजनी गटात उल्लेखनीय विजय संपादित करत महाविद्यालयाचा झेंडा उंचावला.
या संघाचे व्यवस्थापन संघ व्यवस्थापक म्हणून तसेच फायटर्स ग्रुप स्पोर्ट्स अकॅडमीचे एन-एस एनआयएस कोच राष्ट्रीय खेळाडू व वरिष्ठ विद्यार्थिनी ऋतुजा टोम्पे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. तर खेळाडू तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे मुख्य प्रशिक्षक व क्रीडा प्राध्यापक प्रा.चैतन्य पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व विद्यार्थी तयार झाले आहेत.
कराटेबरोबरच विविध क्रीडा प्रकारांत हॉकी,बॉक्सिंग,आर्चरी,कराटे, वुशू, तायक्वांदो,अशा अनेक क्रीडा प्रकारात श्री संत जनाबाई महाविद्यालय सातत्याने भक्कम यश मिळवत आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा संस्कारांना योग्य दिशा देत, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि सक्षम स्टेज उपलब्ध करून देत महाविद्यालयाने गंगाखेड परिसरात क्रीडा क्षेत्रातील आदर्श संस्था म्हणून स्थान निर्माण केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com