सेलू,दि 07 (प्रतिनिधी)ः
शहरात 3 दिवसांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अटक असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज दि 07 रोजी समस्त सेलूकरांच्या वतीने मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . मूक मोर्चा असला तरी यामध्ये संतप्त नागरिकांचा आक्रोश दिसून येत होता.
सकाळी साडेदहा वाजता येथील लोकमान्य टिळक पुतळ्या पासून निघालेला मुकमोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला .उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन पाठवण्यात आले.कु अभा राजेश कुलकर्णी शेलगावकर हिने या निवेदनाचे वाचन केल्यानंतर मोर्चातील महिलांच्या वतीने तहसीलदार शिवाजी मगर यांना हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक संतोष बबनराव मलसटवाड, नितिन मनोज परदेशी व विधी संघर्ष बालक व इतर यांच्या विरुद्ध सेलू पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 2025 अन्वये कलम 4, 8, 9, (L) (F) 10, 12 बालकाचे लैंगिक शोषण अधिकार अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता चे कलम 64(2), (1) 64(2) (M) 64(2) (F) 75, 78, 351 (2), 351 (3) 3 (5) अन्वये अल्पवयिन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे दिनांक 03/10/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्यातील आरोपी क्र. 1 हा व्यावसायाने शिक्षक असुन त्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. उपरोक्त घटना ह्या सुसंस्कृत सेलू शहरात दिवसेंदिवस वाढत चालल्या असून उपरोक्त कृत्याला पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही व त्यामुळे सेलु व परिसरात असे अपराध घडत आहेत, अश्याच प्रशासनाच्या ढिले वागण्यामुळे व प्रशासनाचा गुन्हेगारावर वचक न राहिल्या मुळे सेलुत गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते.असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे . या सर्वावर वचक राहण्याच्या उद्देशाने व पिडितास न्याय मिळावा तसेच सेलूत अशा घटना परत होऊ नयेत म्हणून सर्व सेलुकराच्या वतीने या मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी खालील मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
सदरील प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे व प्रकरण न्याय चौकशी अधिनकैदी (Under Trial) चालविण्यात यावे,सदरील प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी,सदरील प्रकरण्याचा तपास SIT मार्फत करण्यात यावा,पिडितास तिच्या पुढील भविष्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी,सदरील प्रकरणात आणखी आरोपी फरार असुन त्यास तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच पिडितास व त्याच्या कुटुंबियास संरक्षण देण्यात यावे. आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.सदरील मागण्या तात्काळ मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.शहरातील सर्व स्तरातील पुरुष व महिला तसेच प्रतिष्ठित नागरिक या मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
Shabdraj www.shabdraj.com