04/02/26
Breaking News

अल्पवयीन विद्यार्थीनी वरील लैंगिक अत्याचाराच्या विरोधात उद्या सेलूत मूक मोर्चा

आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची एक मुखी मागणी

सेलू / नारायण पाटील – मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरात ए आय प्रणालीद्वारे काढलेल्या फोटो व व्हिडीओ चा वापर करीत बदनामी करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली .या प्रकरणी पंडित मुलीच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसात एका नामांकित संस्थेतील शिक्षकासह दोन आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करून आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे .

 

सर्व सेलूकरांना शरमेने मान खाली घालावी अशी ही अत्यंत संवेदनशील घटना असून याचा निषेध म्हणून सर्व सेलूकरांच्या वतीने पुढील दिशा ठरवण्यासाठी दि ५ ऑक्टोबर रोजी केशवराज बाबासाहेब मंदिरमध्ये एक व्यापक बैठक घेण्यात आली .यातील आरोपींना जमानत न देता कठोरात कठोर शासन करावे अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली व दि ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून मूक मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

यावेळी अशोकराव काकडे ,मिलींद सावंत, प्रसाद महाराज काष्टे ,संतोष कुलकर्णी ,जयसिंह शेळके ,शेख रहीम ,ऍड मुकुंद गजमल ,पोर्णिमाताई जोहिरे ,पांडुरंग कदम ,नरेश पाटील ,राठी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आरोपीला कठोरात कठोर शासन झाले पाहिजे अशी भावना व्यक्त केली .भविष्यात देखील अशा घटना घडू नयेत यासाठी मुलींच्या आई वडिलांनी तसेच सर्व नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे .मोबाईल चा वाढता वापर देखील कमी झाला पाहिजे .तसेच पोलीस प्रशासनाने सर्व शैक्षणिक संस्था ,खाजगी क्लासेस यांची बैठक घेऊन याबाबत सतर्कतेच्या सूचना द्याव्यात व नागरिकांचे देखील अशा घटना टळण्यासाठी एखादे स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे .अशी मागणी करण्यात आली .ही घटना जरी त्या पीडित मुलीच्या व कुटूंबाच्या हिमतीमुळे उजेडात आली असली तरी शहरात अजूनही असे बरेच प्रकार आहेत .परंतु मुली हिंमत करीत नाहीत व अत्याचार सहन करतात यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आधार देणे गरचेचे आहे .असे देखील या बैठकीत ठरवण्यात आले .केवळ आज बैठक घेऊन निषेध व मुकमोर्चा काढून हा प्रश्न सुटणारा नाही यासाठी पालक व नागरिक यांनी सतत सतर्क राहणे गरजेचे आहे.

 

या बैठकीसाठी शहरातील सर्व जाती धर्मातील व सर्वपक्षीय कार्यकर्ते व सुजाण नागरिक तसेच महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चात पुरुष ,महिला व विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले .
बैठकीचे सूत्रसंचालन ह भ प प्रा .संजय पिंपळगावकर यांनी केले तर अभिजित राजूरकर यांनी समारोप केला

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …