सेलू,दि 23 (प्रतिनिधी) ः
सध्याची शिक्षण पद्धती ही शिक्षण तर देत आहे पण शिकलेले सगळेच नौकरी किंवा इतर क्षेत्रात पुढे येत नाहीत.शिक्षण घेऊन साक्षर असलेले असंख्य आहेत पण बेरोजगारांची संख्याही तेवढीच वाढत आहे.यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवावर आधारित शिक्षण देणे आवश्यक असून अनुभवातून शिक्षण दिल्यास आपल्याला जीवनात काय करायचे आहे ते लक्षात येईल व बेरीजगारांची संख्या कमी होईल असे मत ‘ वेगळे शिक्षण देणे शक्य आहे काय?’ याविषयावर बोलतांना पद्मश्री तथा महाराष्ट्रभूषण डॉ अभय बंग यांनी व्यक्त केले.
येथील नूतन कन्या प्रशालेच्या सभागृहात नूतन शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कै.श्रीरामजी भांगडीया स्मारक व्याख्यानमालेचे 50 वे पुष्प त्यांनी गुंफले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यनारायण लोया होते तर व्यासपीठावर डॉ बंग,जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी,माजी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात
उद्योग मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने उत्कृष्ट उद्योग जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त गजानन ऍग्रो इंडस्ट्रीचे महेशराव खारकर,वसुधा महेश खारकर,रामेश्वर राठी,किरण रामेश्वर राठी,संगीत सेवा सन्मानासाठी यशवंत चारठाणकर,मुद्रण क्षेत्रातील योगदानाबद्दल सतीश कुलकर्णी आदी माजी विद्यार्थ्यांचा नूतन संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व्याख्यानमालेचे संयोजक डॉ शरद कुलकर्णी यांनी केले.
पुढे बोलतांना डॉ बंग म्हणाले की,सध्याच्या प्रगत शिक्षणात साक्षरतेचे प्रमाण वाढलेले असतांना खरंच वेगळे शिक्षण शक्य आहे काय? तर सध्याच्या शिक्षण पद्धतीवर उपचार गरजेचे आहे.शहराच्या बाहेर शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिसतात पण शहरात मात्र बेरोजगार तरुणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.शिक्षणाचा हक्क आपण दिला पण चांगले शिक्षण आपण देतो का? हाही प्रश्न आहे.तीव्र स्पर्धेच्या काळात कोटा,लातूर सारख्या शहरात हुशार तरुण आत्महत्याही करत असल्याचे दुर्दैवी चित्र डॉ बंग यांनी मांडले.जीवनाच्या प्रवाहात पोहता येत नसेल तर आयुष्य व्यर्थ आहे.यामुळे आपली शिक्षण पद्धती चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.पास नापास हे धोरणही चुकीचे आहे.सध्याच्या शिक्षण पद्धतीतून शिक्षण मिळते परंतु काम करण्याची ऊर्जा मात्र मिळत नाही.म.गांधी यांनी वर्धा येथे ‘नई तालीम’ या संस्थेत वेगळे शिक्षण देणारी शिक्षण पद्धती सुरू केली.या संस्थेत शिक्षण घेतलेल्या डॉ बंग यांनी तेथील विविध कार्यपद्धती व अनुभव सांगितले.शिक्षण हे आपल्याला माहिती देत पण ते शिक्षण जीवनात कसे वापरायचे हे ज्ञान आपली शिक्षण प्रणाली देत नाही.यामुळे ते आपल्यालाच मिळवावे लागणार आहे.प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे.त्या प्रत्येक विद्यार्थ्यावर वेगवेगळे संस्कार करणे हे महत्वाचे काम शिक्षण व्यवस्थेला करावे लागणार आहे.खरे तर जीवन हेच शिक्षण आहे. पुढच्या काळाचे शिक्षण द्यायचे असेल तर जीवनावर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे.लातूर आणि कोटा शिक्षण प्रणालीवर आक्षेप घेत जीवनाधारीत शिक्षण महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.स्वागतगीत संगीत शिक्षक सच्चीदानंद डाखोरे,पूजा तोडकर यांच्या संचाने केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्यानमालेचे सहसंयोजक प्रा.सुभाष बिरादार यांनी केले तर आभार अशोक लिंबेकर यांनी केले.यावेळी आगळीवेगळी कार्यक्रम पत्रिका तयार केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते अशोक लिंबेकर यांचा सत्कार करण्यात आला.
Shabdraj www.shabdraj.com