घ्या आता… एसटीची भाडेवाढ.. लालपरीचा प्रवास महागला
Shabdraj
September 30, 2025
एसटी महामंडळाने दिवाळी सणाच्या तोंडावर १० टक्के भाडे वाढीचा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडे वाढ लागू असणार आहे. वातानुकूलित आणि शिवाई बस सेवा वगळता सर्व बस सेवांसाठी हा निर्णय लागू असेल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
कुणाकडून अधिकचे भाडे घेतले जाणार?
१४ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून वा तदनंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकीट आकारणी करावयाची आहे. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल, अशा प्रवाशांकडून त्या आरक्षण तिकिटाचा जुना तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक वाहकाने वसूल करावयाचा आहे. थोडक्यात दिनांक १५ ऑक्टोबर, २०२५ च्या ००.०० तासा पासून प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांकडून सुधारित भाडेदराने भाडे आकारणी करावयाची आहेत, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
कुणाकडून अधिकचे भाडे घेणार नाही?
ज्या प्रवाशांचा दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रवास सुरू होऊन तो दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ ला किंवा त्यानंतर संपत आहे अशा प्रवाशांकडून जुने आणि सुधारित प्रवास भाडे फरकाची रक्कम वसूल करण्यात येऊ नये.
दिवाळी गर्दीचा हंगाम संपल्यानंतर मूळ दराने भाडे
दिवाळी गर्दीचा हंगाम संपल्यानंतर म्हणजेच दिनांक ०६.११.२०२५ पासून पुन्हा मूळ प्रति टप्पा दराने म्हणजेच दिनांक २५.०१.२०२५ पासून लागू असलेल्या दराने भाडे आकारणी करण्यात यावी, असेही एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
सध्या सर्व आगारात ईटीआय मशीनद्वारे तिकीट विक्री करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, ईटीआय मशीनमध्ये असलेल्या टप्पा आणि दरपत्रकामध्ये मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांचे मार्फत आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात येतील. सर्व ईलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये सुधारीत दराप्रमाणे भाडे दरपत्रक कार्यान्वित झाले आहे याची खात्री करावी. त्याशिवाय मार्गावर ईटीआय मशीन देण्यात येऊ नयेत.
चालू वर्षाच्या सुरुवातीला झाली होती दरवाढ
उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी टॅक्सी व रिक्षा चालक संघटनांकडून भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागला होता. 24 जानेवारी 2025 पासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मान्यता दिली होती. तशी औपचारिक घोषणाही करण्यात आली होती.
Post Views: 53