ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार; पालकमंत्री, व्यवस्थापकीय संचालक लक्ष देणार?
पूर्णा / प्रतिनिधी – येथिल महावितरण विभागाच्या अभियंत्यांनी शहरात पाणीपुरवठा योजनेसाठी टाकीचे बांधकाम करणाऱ्या एका ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात वीजचोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केवळ थातुरमातुर दंडात्मक कारवाई करत हे गंभीर प्रकरण दडपल्याचे स्पष्ट झाले आहे.
वीजचोरी करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्याने स्थानिक महावितरणच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आता याप्रकरणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उर्जा राज्यमंत्री बोर्डीकर तसेच महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कार्यवाही करणार का याकडे लक्ष लागले आहे.
पुर्णा शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात टाकीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने वीज वाहिन्यांवर आकोडा टाकून बेकायदेशीररीत्या वीज वापरल्याचा प्रकार (ता.२९) ऑक्टोबर रोजी उघडकीस आला. सुरुवातीला महावितरणच्या तपास पथकाने चौकशी सुरु केली होती. मात्र चौकशीच्या दरम्यान ठेकेदारासोबत काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध तसेच राजकीय दबावामुळे थातुरमातुर दंडात्मक कारवाई करून केवळ १लाख१४ हजार ५३० बील देत हे प्रकरण थंड बस्त्यात टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.सदर प्रकरणात जर ठोस आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली असती, तर महावितरणला सुमारे ५ ते ६ लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल झाला असता.मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून हे प्रकरण सोयीस्कररीत्या नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांवर ढकलून दाबल्याची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे.
अधीभारच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा वीजबिल वसूल करून आर्थिक तोटा भरून काढणारी महावितरण कंपनी, लाखो रुपयांची वीजचोरी करणाऱ्या ठेकेदारांवर मात्र कृपादृष्टी ठेवते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय होत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि सहभागी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महावितरण वीज चोरावर मेहरबान?
महावितरणचे स्थानिक अभियंता तसेच ठेकेदार महावितरणचे वरीष्ठ अधिकाऱ्यांवर कुरघोडी करत असताना देखील स्थानिक पातळीवर त्याचेवर एवढी मेहरबानी दाखवत पाठराखण का करत आहेत. त्यामुळे या प्रकरणी गौडबंगाल वाढतच चाललं आहे.“मी मारतो, तू रड” या म्हणीप्रमाणे एकंदरीत हा प्रकार सुरू आहे.
पालकमंत्री कारवाई करणार?
येथिल महावितरणच्या अभियंत्यांनी ठेकेदाराने केलेल्या वीजचोरीचे बील मुख्याधिका-यांच्या नावे देऊन ते बील वसुल केल्याचे पुढे येत आहे.महावितरण पाठोपाठ पालीका प्रशासने देखील ठेकेदारासमोर लोटांगण घातले? हा ठेकेदार नेमला आहे तरी कोण? त्याने सर्वांना मॅनेज केले का? केले तर यात काही मोठी तडजोड झाली? असा आरोप होत आहे.त्यामुळे आता जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या प्रकरणी कारवाई करतात का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
Shabdraj www.shabdraj.com