17/10/26
Breaking News

शेख दांपत्याने रोवला गंगाखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

दै. प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा, गंगाखेड
कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी आणि स्पर्धा परीक्षांचा कठीण प्रवास एकाच वेळी सांभाळत गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील शिक्षक दांपत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि समाजसेवेची तळमळ यांच्या बळावर शेख नजिमा इसाकसाब व शेख इमाम बागन या दांपत्याने अधिकारीपदापर्यंत मजल मारत अनेकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
मूळ पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या शेख नजिमा इसाकसाब यांनी कुटुंब सांभाळत प्राथमिक शिक्षिकेपासून गटविकास अधिकारी पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत त्यांनी गटविकास अधिकारी पद प्राप्त केले. विशेष म्हणजे जिल्ह्यातून मुस्लिम समाजातील पहिल्या महिला गटविकास अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
या यशासाठी त्यांनी तब्बल आठ वेळा मुख्य परीक्षा व पाच वेळा मुलाखती दिल्या. सध्या त्या सहाय्यक गटविकास अधिकारी (प्रशिक्षणार्थी) म्हणून रुजू होत असून ग्रामीण भागातील समस्या जवळून अनुभवल्याने ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावी काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
दरम्यान, त्यांचे पती शेख इमाम बागन यांनीही प्राथमिक शिक्षक ते अधिकारी असा प्रेरणादायी प्रवास केला आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्थेमार्फत (IBPS) घेण्यात आलेल्या ऑनलाइन विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत यश मिळवत त्यांची जिल्हा परिषद परभणी अंतर्गत समूह साधन केंद्राच्या केंद्र समन्वयक अधिकारी पदावर निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी हे यश संपादन केले आहे.
नोकरी, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि दोन अपत्ये—इहान (१०) व इजान (७)—यांचे संगोपन करत या दांपत्याने आपला संघर्ष यशात रूपांतरित केला. ग्रामीण भागातून शिक्षण घेत अधिकारीपदापर्यंत पोहोचलेल्या या कर्तृत्ववान दांपत्यामुळे गंगाखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. सर्व स्तरांतून शेख दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चौकट क्र. १
शेख नजिमा इसाकसाब यांचा शैक्षणिक व सेवाप्रवास
प्राथमिक शिक्षण (इयत्ता ५ वी): जि.प. प्राथमिक शाळा, मोजमाबाद ता. पालम
इयत्ता ६ वी ते १० वी: इंदिरा गांधी विद्यालय, बनवस ता. पालम
इयत्ता ११ वी व १२ वी: महात्मा फुले विद्यालय, अहमदपूर
बी.ए.: संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड
एम.ए.: पीपल्स कॉलेज, नांदेड
डी.एड.: जोतिबा फुले अध्यापक विद्यालय, नागपूर
बी.एड.: इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली
सेवाकाल:
२०१०–२०१७ जि.प. प्राथमिक शाळा, पोखरभोसी ता. लोहा
२०१८–२०२६ जि.प. प्राथमिक शाळा, धारखेड ता. गंगाखेड
— गटविकास अधिकारी पद प्राप्त; जिल्ह्यातून मुस्लिम महिला म्हणून प्रथम मान.
चौकट क्र. २
शेख इमाम बागन यांचा शैक्षणिक व सेवाप्रवास
इयत्ता ७ वी पर्यंत: रेणुका विद्या मंदिर, राणीसावरगाव
इयत्ता ८ वी ते १२ वी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राणीसावरगाव
बी.ए.: संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड
एम.ए.: पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय, राणीसावरगाव
डी.एड.: भीमराव पाटील अध्यापक विद्यालय, राणीसावरगाव
बी.एड.: इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली
सेवाकाल:
२०१०–२०१७ जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, डासाळा ता. सेलू
२०१८–२०२५ जि.प. प्राथमिक शाळा, धारखेड ता. गंगाखेड
२०२५–२०२६ जि.प. प्राथमिक शाळा, कान्हेगाव वसाहत ता. सोनपेठ
— केंद्र समन्वयक अधिकारी पदापर्यंत यशस्वी वाटचाल.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …