परभणी,दि.10(प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावरील धर्मापुरी फाट्यापासून ते धर्मापुरी पर्यंतच्या रस्ते कामात संबंधित एजन्सीधारकाने कोणत्याही कामाविना सुमारे 27 लाख रुपये उकळल्याचा ठपका राज्य गुणवत्ता निरिक्षक पथकाने ठेकेदारासह भ्रष्ट अभियंत्यांच्या साखळीवर ठेवला असून संबंधितांकडून 27 लाख रुपये वसूल करावेत, अशी शिफारससुध्दा केली आहे.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत योजनेतून धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी या रस्ते कामाकरीता सुमारे 27 लाख रुपये मंजूर केल्यानंतर जिल्हा परिषदे अंतर्गत बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अभियंत्यांसह ठेकेदाराच्या भ्रष्ट साखळीने गेल्या अडीच वर्षांपूर्वीच कोणत्याही कामाविना 27 लाख रुपयांची संपूर्ण रक्कम हडप केली. या पार्श्वभूमीवर धर्मापुरी येथील सरपंच सौ. दिशा नवनाथ पैठणे, उपसरपंच तानाजी भाऊराव कदम यांच्यासह सदस्य राजकर्ण साहेबराव कदम, शेतकरी गोविंद कुंभकर्ण कदम व ग्रामस्थ रमेश बाबुराव कदम यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या. माध्यमांनीही त्या प्रकाराबद्दल जिल्हा परिषद बांधकाम विभागावर टिकेचे झोड उठविले. धर्मापुरी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केल्यानंतर पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी या प्रकरणात तात्काळ चौकशीचे आदेश बजावले. त्याआधारे जिल्हा परिषद प्रशासनाने हे प्रकरण राज्य गुणवत्ता निरीक्षकांकडे सुपूर्त केले. तेव्हा राज्य गुणवत्ता निरीक्षक श्रेणी-2चे अभियंता व वरिष्ट अधिकारी दत्तात्रय प्रल्हादराव रणखांब (छत्रपती संभाजीनगर) यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने गेल्या गुरुवारी धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी या कथित रस्त्यास भेट दिली. त्यावेळी या पथकास रस्ते कामात भ्रष्ट साखळीने केलेला आनंदी आनंद निदर्शनास आला. तेथील एका नळकांडी पुलास 1000 मिमीचे दोन पाईप वापरण्याची आवश्यकता असतांना संबंधित भ्रष्ट साखळीने एकच पाईप तो ही 900 मिमीचा वापरल्याची, तसेच 1.23 रुंद सिमेंटच्या काँक्रिटीकरणात केवळ 23 सेंटी मीटर काँक्रीटीकरणाचे काम झाल्याचीही बाब निदर्शनास आली. या पथकाने जेसीबी मशीनद्वारे ते काम उखडले तेव्हा एका झटक्यात तो डोलारा कोसळला. पथकाने रस्त्याचे काम तर झालेच नाही, हे लगेच हेरले. अन् या पथकाने मंगळवारी (दि.09) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांना या संबंधिचा अहवाल सादर केला. त्या अहवालात 2 सप्टेंबर रोजी आपण पाठविलेल्या पत्रानुसार नमूद केलेल्या विषयांकित कामाची संयुक्तस्थळ पाहणी करण्यात आली. त्यावेळी तक्रारकर्ते, अभियंते, कर्मचारी, ठेकेदारांचे प्रतिनिधी वगैरे आठजण उपस्थित होते, असे नमूद करीत या रस्त्याचे टीचभरसुध्दा काम केल्या गेले नाही. पुलावरील कामातसुध्दा गुणवत्तेसह साहित्य वापराबाबत आनंदी आनंद आहे, हे स्पष्ट करीत या कामापोटी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने एप्रिल 2023 मध्येच अदा केलेल्या 27 लाख रुपयांच्या रक्कमेची रिकव्हरी करावी, अशी स्पष्टपणे शिफारस केली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत कार्यकारी अभियंता धोंडीराम उडानशिवे यांच्यासह उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांसह अन्य भ्रष्ट साखळी व संबंधित शिवनेरी कन्स्ट्रक्शन ही एजन्सी या अहवालाने अभुतपूर्व अडचणीत सापडली आहे. यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्याद्वारे फौजदारी गुन्हे दाखल होतील, असे स्पष्ट संकेत आहेत.
भ्रष्ट साखळीद्वारे पुन्हा लपवा लपवीचा प्रकार…
या रस्त्याच्या प्रकरणात भ्रष्ट साखळीने मोठा गदारोळ उठल्यानंतर 20-25 टिप्परद्वारे साहित्य आणून टाकण्याचा प्रकार केला, हे या पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने त्या गोष्टीचीही दखल घेतली व त्या पाहणी दौर्यातून वस्तुनिष्ट केलेल्या चौकशीतून त्या संबंधीचा स्पष्ट अहवाल सादर केला.
Shabdraj www.shabdraj.com