Ayushman Card campaign in Parbhani!
Target to complete eKYC within 3 months.
परभणी, दि. १७ : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड (eKYC) तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वंदना कार्ड निर्मिती व वितरणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
परभणी जिल्ह्यातील पात्र प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आयुष्मान व वय वंदना योजनेचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत,अशी सूचना जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली आहे.
राज्यात आयुष्मान कार्ड निर्मितीचे सरासरी प्रमाण ४२ टक्के असून परभणी जिल्ह्यात सुमारे १६ लाख ८ हजार पात्र लाभार्थ्यांपैकी ८ लाख ३८ हजार कार्डांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्याची प्रगती ५२ टक्के आहे. तसेच वय वंदना कार्ड निर्मितीमध्ये राज्याची सरासरी १५ टक्के असून परभणी जिल्ह्याची प्रगती १४ टक्के आहे.
मोहीम यशस्वी करण्यासाठी आशा सेविका, स्वस्त धान्य दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्र, क्षेत्रीय कर्मचारी तसेच लाभार्थी लॉगिनद्वारे कार्ड निर्मितीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थी स्वतः किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनेही आयुष्मान कार्ड तयार करून त्याची प्रत प्राप्त करू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (NHA) Beneficiary Identification System (BIS) पोर्टलवरील माहिती अद्ययावत करण्यात आली असून, eKYC न झालेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय व गावनिहाय यादी संबंधित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या आधारे प्रत्येक गावात विशेष शिबिऱाचे आयोजन,आशा स्वयंसेविका सेविका, स्वस्त धान्य दुकानदार व आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत लाभार्थ्यांशी संपर्क साधून तसेच घरभेटीद्वारे कार्ड निर्मितीचे काम करण्यात येत आहे.
मोहीम कालावधीत लाभार्थी लॉगिनद्वारे स्वतः कार्ड तयार करण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून, ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, संघटना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सहभागातून कार्ड काढण्यात येत आहे.
७० वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वय वंदना कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्वतःचे व आपल्या कुटुंबीयांचे आयुष्मान कार्ड निश्चित कालावधीत तयार करून घ्यावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
Shabdraj www.shabdraj.com