04/02/26
Breaking News

पालीका निवडणुकीत  सार्वजनिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांना का संधी नाही ?

 रामप्रसाद ओझा,
गंगाखेड,दि 07 ः
गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला राखीव जाहीर झाले असून, तेरा प्रभागांतील एकूण २६ जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. महिला सहभाग, नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही आरक्षण प्रणाली अस्तित्वात असली तरी प्रत्यक्षात मात्र सार्वजनिक क्षेत्रात अथक परिश्रम घेणाऱ्या, सामाजिक कामाचा भक्कम पाया असलेल्या सक्षम महिलांना राजकीय पक्षांकडून आवश्यक ती संधी मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण व महिला सक्षमीकरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या अनेक महिलांनी त्यांच्या योगदानातून शहराला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. नियमितपणे अपंग/दिव्यांग आणि नेत्रहीन नागरिकांच्या सेवेत गुंतलेल्या मंजुजिजी दर्डा, गोदावरी स्वच्छता अभियान व महिला दक्षता समितीमार्फत जनजागृती करणाऱ्या ॲड. स्मिता देशमुख, ग्राहक संरक्षण चळवळीत सक्रिय भूमिका घेणाऱ्या प्रतिभा वाघमारे, बालमजुरी, परित्यक्त व विधवा महिलांसाठी मदतकार्य करत असलेल्या सुर्यमाला मोतिपोवळे, तसेच महिला सक्षमीकरण, धार्मिक-सामाजिक बांधणीत कार्यरत प्रभा राजेंद्र, सविता राखे, सवंगडी कट्टा च्या माया औसेकर, पद्मजा कुलकर्णी,उषा चिनके ,वंदना आंबेकर या महिला समाजात प्रत्यक्ष बदल घडवून आणण्याचे काम करत आहेत.
पर्यावरण क्षेत्रात दिव्या बंग, ज्ञानेश्वरी लटपटे.
त्याचप्रमाणे राजकीय स्तरावर सक्रिय असलेल्या ममता पैठणकर, माधुरी राजेंद्र, मंजुषा जामगे, श्वेता आचार्य, सुनिता घाडगे, तसेच अनुभवी माजी नगरसेविका शकुंतला कुलकर्णी यांनीही संघटन, जनसंपर्क आणि विकासविषयक कामात सातत्य दाखविलेले आहे.

……..तरीदेखील — प्रश्न कायम आहे……
हे सर्व परिश्रम, सामाजिक भक्कम आधार, प्रत्यक्ष जनसंपर्क आणि लोकांमध्ये असलेला विश्वास असूनही या महिलांना राजकीय पक्ष उमेदवारी, नेतृत्वाची संधी किंवा निर्णायक पदे देण्यास का टाळाटाळ करत असतील?

……….राजकीय समीक्षकांचे मत असे की ….
पक्ष नेहमी मतांची समीकरणे, गटबाजी आणि आर्थिक शक्ती याला प्राधान्य देतात.
प्रामाणिक सामाजिक काम करणाऱ्या महिला “मोहिमेच्या खर्चात” किंवा “धोरणात्मक खेळात” बसत नाहीत, असा गैरसमज अनेक ठिकाणी अद्याप कायम आहे.
निवडणुकीतील संघटनशक्तीपेक्षा आर्थिक पाठबळाला अधिक महत्त्व दिले जाते.
महिलांचे नेतृत्व केवळ प्रतीकात्मक राहू नये, यासाठी पक्षांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
आज गंगाखेडमध्ये राजकारणासोबतच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या, कार्यक्षमता आणि लोकमान्यता लक्षणीय आहे. त्यामुळे पक्षांनी सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत महिलांना अग्रभागी आणण्याची वेळ आता आली आहे, असा नागरिकांचा आवाज वाढताना दिसतो.

 

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …