04/02/26
Breaking News

पुरात अडकलेल्या बळेगावच्या युवकाची अडिच तासानंतर सुटका

हिंगोली,दि 13 ः
वसमत तालुक्यातील दारेफळ शिवारात पुलावर ओढ्याला आलेल्या पुरात अडकलेल्या बळेगाव येथील तरुणाची अडीच तासानंतर सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

बळेगाव येथील संतोष लांडगे हे शुक्रवारी दिनांक 12 रोजी  रात्री जवळा बाजार येथून करंजी दारेफळ मार्गे ते गावाकडे निघाले असता आठ वाजेच्या सुमारास दारेफळ शिवारातील एका ओढ्यावरील पुलावर पुराचे पाणी आले होते. पुलाच्या अलीकडच्या बाजूला पाणी कमी असल्याने त्यांना अंधारात पाण्याचा अंदाज आला नाही त्यांनी दुचाकी चालवत पुढे गेले असता पुलावर मध्यभागी आल्यावर त्यांना समोरील दृश्य पाहून धडकी भरली. अर्ध्याहून अधिक पुलाचा भाग हा पूर्णपणे पाण्यात गेला होता. समोर दुचाकीच्या प्रकाशात सर्वत्र पाणी दिसत होते. त्यामुळे त्यांनी जागीच थांबण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी मागे वळून पाहिले असता मागे देखील पाण्याचा मोठा प्रवाह दिसून आला त्यामुळे मागेपुढे सर्वत्र पाणी दिसू लागले आपण फसलो याची त्यांना जाणीव झाली त्यामुळे दुचाकीच्या उजेडात त्यांनी पुलावर असलेले एका झुडपाला धरून ठेवले हळूहळू पुलावर पाणी वाढू लागले काही वेळा त्यांची दुचाकी अर्धी बुडाली त्यामुळे दुचाकीचा प्रकाश देखील बंद झाला त्यांनी तातडीने गावाकडे संपर्क साधला तसेच दारेफळ येथील काही मित्रांना फोन केले. गावाकडे देखील पूर परिस्थिती असल्याने बळेगाव येथून तात्काळ मदत मिळाली नाही परंतु दारेफळ येथील ग्रामस्थ पुलाजवळ आले परंतु अंधारात त्यांनाही संतोष हे कुठे दिसत नव्हते तसेच आवाजही येत नव्हता. ग्रामस्थ पुलाच्या दुसऱ्या बाजूने हक्का मारत होते तर संतोष अलीकडच्या बाजूने परंतु पावसाचा आणि पुराचा आवाज यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता काही वेळेला पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. परंतु पूल परिसरात दोन्ही बाजूला 400 मीटर अंतरापर्यंत पुराचे पाणी होते अखेर साडेदहाच्या सुमारास ग्रामस्थांनी दोरीच्या साह्याने गटागटाणे पूल ओलांडाचा निर्णय घेतला आणि मध्यभागी संतोष लांडगे आढळून आले दोरीच्या साह्याने त्यांना बाहेर काढण्यात आले दुचाकी त्यांनी तिथे सोडून दिली जेव्हा त्यांना बाहेर काढले. काही वेळानंतर हट्टा पोलिसांचे पथक दाखल झाले. संतोष लांडगे यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले.दारेफळ येथील तरुणांनी धाडस दाखवल्याने लांडगे यांचे प्राण वाचले आहेत.

 

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …