परभणी,दि 14 ः
परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाच्या समयसूचकतेमुळे आणि कुशलतेमुळे एका सात वर्षीय बालकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. एका सात फूट खोल गटारात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकावर तातडीने शस्त्रक्रिया करून त्याला नवे आयुष्य देण्यात आले.
परभणी शहरात एका भागात एक सात वर्षीय बालक सात फूट खोल गटारात पडला. तब्बल तीन तास बेशुद्ध अवस्थेत गटारात अडकलेला हा बालक त्याच्या आई-वडिलांना आढळला. त्याला तात्काळ आर.पी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत बालकाच्या छातीत गंभीर दुखापत झाल्याचे आणि त्याच्या शरीरात हवा भरल्याचे आढळून आले. याशिवाय, गटारातील दूषित पाणी त्याच्या शरीरात गेल्याने तातडीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.या गुंतागुंतीच्या परिस्थितीत आर.पी. हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने तत्परतेने कारवाई केली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अमीर तडवी यांनी डॉ. अश्विनी नाईक,डॉ. उर्वशी आणि बालरोग तज्ञ डॉ.बाबासाहेब गायकवाड यांच्या सहाय्याने रात्री १२ वाजता ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेदरम्यान बालकाच्या शरीरातील हवा आणि दूषित पाणी काढण्यात आले. त्यानंतर, त्याला पाच दिवस पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (PICU) मध्ये विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले. सुदैवाने, वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे बालक पूर्णपणे बरा होऊन घरी परतला.याबद्दल बालकाच्या आई-वडिलांनी आर. पी. हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “आमच्या मुलाला नवे आयुष्य देण्यासाठी डॉक्टरांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. आम्ही त्यांचे आणि रुग्णालयाचे कायम ऋणी राहू,” असे त्यांनी भावूक होऊन सांगितले.
महाविद्यालयाचे प्रमुख आणि आ.डॉ.राहुल पाटील यांनी आर.पी.हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमचे कौतुक करत रुग्णालयाच्या कार्याला सलाम केला.रुग्णालयाचे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
Shabdraj www.shabdraj.com