परभणी,दि 18
येलदरी धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडून तब्बल २११००.४० क्युसेसने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात केला जात आहे.त्यामुळे सोमवारी (दि18) पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तर धरणाच्या पुढील बाजूस असलेल्या जिंतूर-सेनगाव महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मराठवाड्यातून विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
सोमवारी (दि.१८) सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी येलदरी धरणाचे एकूण १० दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले.येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच खडकपूर्णा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येलदरी जलाशयात जलपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रथम ६ दरवाजे आणि नंतर एकूण १० दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. येलदरी धरणातून मुख्य गेटद्वारे २११००.४० क्युसेस, जलविद्युत केंद्रातून २७०० क्युसेस अशाप्रकारे एकूण २३८००.४० क्युसेस विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणाच्या पुढच्या बाजूला असलेला जिंतूर-सेनगाव हा महामार्ग ठप्प झाला आहे. या महामार्गावरील धरणापुढचा पूल पाण्याखाली गेला असून, आज (सोमवार) सकाळपासून दुपारनंतरही ही परिस्थिती कायम होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या. विशेष म्हणजे हा महामार्ग बंद झाल्याने मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा एक रस्ता बंद झाला असून, विदर्भाशी संपर्क तुटला आहे.
Shabdraj www.shabdraj.com