04/02/26
Breaking News

एकदाच द्या उत्पनाचा दाखला आणि अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळवा शिष्यवृत्ती

मुंबई : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार, आता शिष्यवृत्तीसाठी वारंवार उत्पन्न दाखला आणि इतर कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्राह्य धरली जाईल आणि ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा होईल.

 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थी एकदाच उत्पन्नाचा दाखला आणि आवश्यक कागदपत्रे सादर करतात. ही माहिती ऑनलाइन तसेच ऑफलाइन पडताळणी करून निश्चित केली जाते. त्यामुळे अभ्यासक्रम संपेपर्यंत पुन्हा तीच माहिती मागवू नये, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

 

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यावर चर्चा झाली.

 

महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) वर विद्यार्थ्यांनी एकदाच कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
तर वारंवार तीच माहिती देण्याची आवश्यकता राहणार नाही.
विद्यापीठांनाही पुन्हा कागदपत्रे तपासण्याची गरज पडणार नाही.
त्यामुळे वेळेची बचत होईल आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकर मिळेल.
निधी वेळेत वितरित होणार

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारच्या हिस्स्याची 60% रक्कम वेळेत जमा व्हावी यासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर मागास विभागांनी यासाठी कालबद्ध नियोजन करावे, असेही आदेश देण्यात आले.

Check Also

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांकडून मोठा खुलासा…

मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता …