कैलास चव्हाण
परभणी/हिंगोली दि 13 ः
कुणाच्या चेहऱ्यावर हसू तर कोणाच्या कपाळावर आठ्या तर कोणी स्तब्ध अशा अनेक भावमुद्रा जिल्हा परिषदेच्या राजकीय आखाड्यातील पुढार्यांच्या पाहायला मिळाल्या. काही खुशी कही गमचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले. निमित्त होते जिल्हा परिषदेच्या गटनिहाय आरक्षण सोडतीचे आजच्या सोडतीने परभणी हिंगोली जिल्ह्यातील अनेक मातब्बर आणि प्रस्थापीतांना मोठे धक्के मिळाले आहेत त्यामुळे आता निवडणुकीचा उडू द्या बार असे म्हणण्याची वेळ आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेतील जिल्हा परिषद ही महत्त्वाची आणि जिल्ह्याच्या राजकारणाची भाकरी फिरणारी संस्था म्हणून पाहिले जाते. 2017 नंतर या निवडणुका 2022 मध्ये होणे अपेक्षित होते, परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या अखेर न्यायालयीन तिढा सुटला आणि निवडणुका घेण्याचे आदेश आले.तेव्हापासून निवडणुक आयोग आणि तसेच इच्छुकांनी देखील तयारी सुरू केली अनेक दिवसांपासून विविध कार्यक्रमाच्या निमीत्ताने भेटीगाठी घेत मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इच्छुकांनी सुरू केला होता. आपला गट आपल्याला सुटेल अशी भाबडी अशा बाळगून अनेकांनी खर्च करण्यास देखील सुरुवात केली होती. यातील अनेकांना आज मोठे धक्के मिळाले तर काहींना खुशी गगनात मावेनाशी झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. सकाळपासूनच या ठिकाणी राजकीय पुढार्यांची गर्दी होती. नवोदित उदयाला येणारे नेतृत्व आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते यांनीही गर्दी केली होती. तातडीने आपल्या गटाचे आरक्षण जाहिर होताच गावाकडे बातमी पोहोचण्याची घाई केली जात होती. …जमलं बुवा…. संपला खेळ…. बरं झालं लय उड्या मारू लागला…… असे अनेक संवाद याठिकाणी ऐकायला मिळाले. सोडत जाहीर झाल्यामुळे आता इच्छुकांना उमेदवारीसाठी नेत्यांकडे मनधरणी करावी लागणार आहे. राजकीय पक्षांनी देखील अनेक दिवसांपासून सोडती नंतरच्या स्थितीची चाचपणी सुरू केली आहे. आता तिला प्रत्यक्षात रूप मिळणार आहे.
…….हिंगोलीत जिल्ह्यातही कहीखुशी कहीगम……..
हिंगोली जिल्ह्यातील 54 गटासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी देखील अनेकांना धक्के मिळाले. मागील अनेक वर्षापासून केलेला खर्च आणि तयारी पाण्यात गेल्याचे अनेकांनी बोलुन दाखवले.तर काहींना मना सारखे आरक्षण जाहीर होताच आनंद गगणात मावेनासा झाला होता.जनु आजच निवडणुक जिंकली अशा अर्विभावात सोशल मिडीयावर अनेकांचे समर्थक कार्यकर्ते जल्लोष करत होते.
Shabdraj www.shabdraj.com