25/06/26
Breaking News

मानसिक आरोग्यात व्यक्तीसोबत समाज, देश व जग बदलण्याची ताकत – डॉ. गोविंद यादव

परभणी – येथील शारदा महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करताना जिल्हा सामान्य रुग्णालय परभणीचे मनोविकारतज्ञ डॉ. गोविंद यादव म्हणाले की, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण मानसिक आरोग्यात व्यक्तीसोबत समाज, देश व जग बदलण्याची ताकत आहे. मानसिक आजार, मानसिक विकृतीचे परिणाम व्यक्ती, कुटुंबासह सर्व समजाला भोगावे लागतात. असंख्य व्यक्तींना मानसिक आजाराची ओळख नसल्याने मानसोपचार घ्यायला तयार होत नाहीत, यामुळेच समाजात मानसिक आरोग्याबाबत जाणीव जागृतीसाठी सर्व मानसिक आरोग्य व्यावसायिकांची मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आरोग्यसेवक यांची महत्त्वाची भूमिका आहे असे प्रतिपादन करून आजची जीवनशैली, स्पर्धात्मक जग, मोबाईल व समाज माध्यमांचा अतिरेकी वापर मानसिक आजाराला कारणीभूत ठरत आहे असे म्हणत मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान, योगासने, प्राणायाम व शिथिलीकरण तंत्रासह विचार- भावनावरील नियंत्रण शिकणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून घोषित केला आहे, विद्यार्थ्यांत व समाजात जाणीव जागृतीसाठी महाविद्यालयाने घेतलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन डॉ . यादव यांनी केले.

 

शारदा महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मनोविकारतज्ञ डॉ. गोविंद यादव व गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संतोष नाकाडे, मानसोपचारक नूरजहाँ बेगम,, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एन.व्ही. सिंगापुरे, प्रा . डॉ.गोपाल पेदापल्ली विचारमंचावर उपस्थित होते. यावेळी कु. श्रेया आंबुरे , दिव्या अंभोरे, राहत परवीन, आयेशा खानम, वैशाली सोनाळे यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी माजी विद्यार्थीनी व छत्रपती संभाजी नगर येथील शांती नर्सिंग होम येथे कार्यरत मानसोपचारक नूरजहाँ बेगम हिने आपल्या मनोगतात मानसिक आरोग्य संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तयार केलेले भित्तीपत्रके उत्तम व मार्गदर्शक असून मानसिक आरोग्य स्वास्थ्यासाठी व्यक्तीने पंचसूत्रीचे पालन करावे, प्रत्येक व्यक्तीला चांगले हसता आले पाहिजे, योग्यवेळी योग्यस्थळी रडता आले पाहिजे, गाणे म्हणता किंवा गुणगुणता आले पाहिजे, नाचता आले पाहिजे व योग्य वेळी व योग्य स्थळी राग व्यक्त करता आले पाहिजे असे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ.एच. डी. शेवाळे, प्रा. डॉ. सचिन खडके, प्रा. सुरेश जयपुरकर, डॉ.श्रीधर पांढरकर, प्रकाश काळे यांच्यासह पदवी व पदव्युत्तर मानसशास्त्र विषयाचे सर्व विद्यार्थी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एन. व्ही. सिंगापुरे यांनी केले, सूत्रसंचालन कु. राहत परवीन यांनी केले तर आभार कु. श्रद्धा अडणे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सानिया सदफ, प्रा. माणिक लिंगायत, संतोष येडके, शेख जावेद, कु. तनुजा रासवे , राजाराम मुत्रटकर यांनी प्रयत्न केले.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …