सेलू ( प्रतिनिधी)
अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सेवावर्धिनी सेवाभावी संस्थेच्या प्रमुख पदाधिका-यांनी वालूरच्या प्राचिन हेलीकल स्टेप वेल व बारदानी बारवेला धावती भेट देवून त्यांच्या पुनरुज्जीवना बाबत ग्रामस्थांशी प्राथमिक बोलणी केली.
वालूर येथे पाहणीसाठी आलेल्या टीममध्ये सेवावर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा पुणे येथील रोहनबिल्डर्स चे मालक सुहासजी लुंकड,सेवावर्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, प्रकल्प अधिकारी प्रसाद देशपांडे,समन्वयक अमोल काटीकर यांचा समावेश होता.ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय साडेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मारूती बोडखे,गणेश मुंढे,शांतनू पाठक,स.ना. अन्सारी,इस्माईल सेठ अन्सारी परभणी येथुन आलेले अभियंते आशिष निलावार,सचिन विहिटकर,मल्हारिकांत देशमुख उपस्थित होते.
प्रास्ताविकात सरपंच संजय साडेगांवकर यांनी गावकऱी मंडळींनी श्रमदानातून रात्ररात्र जागून दोन्ही बारवा स्वच्छ केल्या परंतू शासन-प्रशासनाने लोकप्रतिनिधीने बारव दुरुस्तीसाठी कुठलाही निधी दिला नाही. परिणामी आमची नाराजी असल्याचे बोलून दाखविले. या प्रसंगी बोलतांना सुहासजी लुंकड यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, गावक-यांनी सहकार्य केल्यास डिसेंबर महिन्यात आमची टेक्निकल टीम येवून आराखडा तयार करेल असे सांगीतले. इथे उल्लेखनीय बाब म्हणजे पाहूणे मंडळींनी सत्कार तर सोडाच साधे फुल देखील स्विकारले नाही.
अहिल्याबाई होळकर बारव पुनरुज्जीवन हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. राज्यातील ईतिहासतज्ज्ञ ,विचारवंत या संस्थेशी संलग्न आहेत. संस्थेने पश्चिम महाराष्ट्रातील १७ बारवांचे पुनरूज्जीवन पूर्ण केले असून २०२६ च्या जून पर्यंत ३८ बारवांचे काम पूर्णत्वास जाणार आहे. संस्थेने निवडलेली वालूर ही मराठवाड्यातील एकमेव बारव आहे.
सेवावर्धिनी ही एक राष्ट्रीय विचारांची संस्था असून
या संस्थेची स्थापना १९९८ मध्ये मुंबई येथे संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. समाजातील दुर्बल घटकांना सबल करून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करते. कोणत्याही कामासाठी सेवावर्धिनी शासनाकडून व शासनाच्या कोणत्याही अभीकरणा कडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घेत नाही. देशातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या आर्थिक सहाय्यावर अशी कामे केली जातात. संस्था सध्याला नेवासे जि. नगरच्या पिचडगाव येथील ९०० वर्षापूर्वीच्या बारवेचे पुनरुज्जीवन करीत आहे.
Shabdraj www.shabdraj.com