04/02/26
Breaking News

कर वाचवण्यासाठी शेती करणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नको:बच्चू कडू यांचा फॉर्म्युला

नागपूरमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाचा तोडगा अखेर दृष्टीपथात येऊ लागला आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला येण्यास होकार दिला आहे. सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, हमीभाव, बोनस, आणि शेतमाल खरेदी केंद्रांबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. बच्चू कडू यांनी या बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना सरकारने गरजवंत शेतकऱ्यांसाठी खरी कर्जमाफी द्यावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे.

बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, आर्थिकदृष्ट्या सक्षम, सरकारी नोकरी करणारे, पेन्शनधारक किंवा केवळ कर वाचवण्यासाठी शेती करणाऱ्या व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ देऊ नये. डिजिटल इंडियाच्या काळात प्रत्येकाची आर्थिक स्थिती काही मिनिटांत शोधता येऊ शकते. मग खर्‍या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने गरजवंत शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांना त्वरित कर्जमाफी जाहीर करावी, असे ते म्हणाले. बच्चू कडू यांच्या म्हणण्यानुसार, कर्जमाफी केवळ घोषणांपुरती न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणारी ठरावी, हीच त्यांची भूमिका आहे.

बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या 8 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

  • सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करणे
  • कृषी मालाला हमीभावावर 20 टक्के अनुदान देणे
  • ग्रामीण घरकुलासाठी शहराप्रमाणे पाच लाख रुपयांचे अनुदान देणे
  • पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च मनरेगाच्या माध्यमातून भागवणे
  • नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे
  • विधवा, निराधार, दिव्यांग आणि अनाथांना दरमहा सहा हजार रुपये मानधन देणे
  • मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करणे
  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे