04/02/26
Breaking News

आकडेखोर ठेकेदाराचे बील पुर्णा पालीकेच्या मुख्याधिका-यांच्या माथी

पुर्णा,दि.५(प्रतिनिधी)
महावितरणच्या कारभारातील ढिसाळपणा, ठेकेदारांस पाठीशी घालण्यासाठी सुरू केलेला संगनमताचा खेळ आणि या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी वर्गाचा थंड निष्क्रियपणा या त्रिसंधीने पुर्णा शहरात वीजचोरीचे प्रकरण अक्षरशः गाजवले आहे. आकडेखोर ठेकेदाराने उघडपणे वीजचोरी करून महावितरणला चुना लावला,पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र कारवाई ऐवजी ‘थातुरमातुर नाटक’ रचून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. धक्कादायक म्हणजे या चोरीचे बील ठेकेदाराऐवजी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर फाडल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे महावितरण चोर सोडून सन्याशाला फाशी देतयं.? असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पुर्णा पालीकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात नवी पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे.या बांधकामाच्या कंत्राटदाराने मागील काही महिन्यांपासून विद्युत वाहीन्यांवर अकोडा टाकून वीजचोरी करत असल्याचा प्रकार (ता.२९) उघडकीस आल्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वीज तारेवर टाकलेला अकोडा व ठेकेदाराचे साहित्य जप्त केले होते.गुन्हा दाखल न करताच महावितरण अधिकाऱ्यांनी थातुरमातुर दंडात्मक कारवाई करत चोरलेल्या वीजेसाठी ७९ हजार ५३० रुपये व असेसमेंट २५ हजार रुपये असे १ लाख १४ हजार ५०० रुपयांचे बील दिले खरे मात्र ते बील संबंधित ठेकेदाराच्या नावे न फाडता चक्क मुख्याधिकारी नगरपरिषद पुर्णा यांच्या नावाने देऊ केले.सदरील कामाचा ठेकेदारानेच  वीज चोरल्याचे स्पष्ट उघडकीस आले. तरीही त्या ठेकेदारास सोईस्कर पणे बाजुला करुन पालीकेला का वेठीस धरले जात आहे,हे  मात्र अनुत्तरितच आहे.नियमाप्रमाणे वीजेची चोरी करणाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.परंतु या प्रकरणात तसे न होता भलतेच कुटाने महावितरण अधिकाऱ्यांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे महावितरण कंपनीचे अभियंता हे नेमके चाललंय तरी.? असा प्रश्न पडतो आहे.याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वार्तालाप केला असता ठेकेदार कोण आहे, मी बघतो, मी करतो,माझी तयारी झाली आहे.ठेकेदार नसल्याने मुख्याधिकारी यांना बीले असे तोडक्या मोडक्या भाषेत उत्तर मिळाले, परंतु हा प्रकार म्हणजे “चोर सोडून सन्याशाला फाशी?”असा असल्याचे दिसून येत आहे.
पूर्णेतील महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयात मागील काही दिवसांपासून अश्याच प्रकारे गोंधळ सुरु आहे.कधी दिवस दिवस बत्तीगुल होणे,मान्यता न घेता विद्युत रोहीत्र,खांब परस्पर बसवून देणे,तसेच विद्युत पुरवठा न देताच ग्राहकांना वीज बील माथी मारणे असे एकापाठोपाठ एक गंभीर प्रकार दिसत आहेत.येथिल कारभा-यांच्या गलथान पणामुळे कार्यालयाची जनमानसात मलीन होत असलेल्या महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाणीपुरवठा योजनेसाठी टाकीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने वीजचोरी केली.परंतु महावितरण कंपनीच्या वतीने पुर्णा पालीकेच्या मुख्याधिका-यांच्या नावाने याचे बील देऊ केले आहे.त्यामुळे आता मुख्याधिकारी जनतेचा पैसा ठेकेदाराच्या वीजचोरीच्या बीलांसाठी वापरणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …