04/02/26
Breaking News

पुर्णा भागात नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा महावितरणकडून छळ

पुर्णा प्रतिनिधी( सुशीलकुमार दळवी):
पुर्णा शहर व तालुक्यात सध्या महावितरणच्या भरारी पथकांनी अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण केले असून वीजचोरी रोखण्याच्या नावाखाली सामान्य, नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. गेल्या चार दिवसांपासून पुर्णा शहरासह ग्रामीण भागात महावितरणची भरारी पथके घरोघर, दुकाने, कारखाने येथे अचानक धडक देत तपासणी करत आहेत.

या तपासणीदरम्यान जिथे-जिथे महावितरण अधिकाऱ्यांना वीजबिलाबाबत शंका वाटते, तिथे कोणतीही पूर्वसूचना न देता थेट घरात प्रवेश केला जात आहे. घरात वापरात असलेली सर्व विद्युत उपकरणे तपासून, कोणताही ठोस पुरावा नसताना मीटर जप्त करून ते थेट परभणी येथील कार्यालयात पाठवण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बहुसंख्य ग्राहक हे नियमित वीजबिल भरणारे असल्याचा आरोप आहे.

वीजग्राहकांचे म्हणणे आहे की, भरारी पथकातील काही कर्मचारी व कंत्राटदार महिलांशी व वृद्धांशीही धमकीच्या भाषेत बोलत असून, “तुमच्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल करतो, पोलीस केस लावतो” अशा शब्दांत भीती घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणताही लेखी आदेश न दाखवता, कायदेशीर प्रक्रिया न पाळता घरात घुसखोरी केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

एकीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना, फ्युजकोल सेंटर, तक्रार निवारण यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. लाईट गेल्यावर तासन्‌तास कर्मचारी फिरकत नाहीत, मात्र मीटर जप्त करण्यासाठी भरारी पथके तत्परतेने हजर होत असल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

विशेष म्हणजे वीजचोरी मोठ्या प्रमाणावर असलेल्या भागांकडे दुर्लक्ष करून, नियमित बिल भरणाऱ्या ठराविक भागांमध्येच ही पथके वारंवार घिरट्या घालत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे “सुलतानी वसुली” सुरू असल्याची चर्चा खुलेआम रंगू लागली आहे. काही ठिकाणी वीजचोरी पकडल्याचा बनाव करून घाबरलेल्या ग्राहकांकडून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत जागेवरच ‘टेबलखालून चिरीमिरी’ घेऊन प्रकरण मिटवले जात असल्याची कुजबुज दबक्या आवाजात वीजग्राहकांत सुरू आहे.

या सर्व प्रकारांमध्ये महावितरणमधील काही कंत्राटदारांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीनेच हा ‘भरारी उद्योग’ सुरू आहे का? असा सवाल आता पुर्णेकर नागरिक विचारू लागले आहेत.

एकीकडे पुर्णा शहर व परिसर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाढव्यांच्या त्रासातून, मोकाट कुत्र्यांच्या दहशतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे महावितरणच्या भरारी पथकांच्या सुलतानी कारभारामुळे सामान्य नागरिक थेट संकटाच्या खाईत लोटला गेला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता व ऊर्जामंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन भरारी पथकांच्या कारवाईची चौकशी करावी, दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी पुर्णा परिसरातून होत आहे. अन्यथा पुर्णेकर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …