04/02/26
Breaking News

फास्ट फिटर लाईनचा वीजपुरवठा खंडित,गंगाखेड शहरातील पाणीपुरवठा ठप्प, टंचाईचे सावट

दै शब्दराज रामप्रसाद ओझा गंगाखेड :
गंगाखेड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला आज मोठा धक्का बसला असून फास्ट फिटर लाईनचा विद्युत पुरवठा कट झाल्याने सकाळपासून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या माखणी येथील मासोळी मध्य प्रकल्पातून सुमारे ७० टक्के पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पासाठी गंगाखेड ते माखणी दरम्यान स्वतंत्र फास्ट फिटर वीजवाहिनी कार्यरत आहे.

मात्र संबंधित विद्युत बिल वेळेत अदा न केल्यामुळे महावितरण कंपनीने थेट वीजपुरवठा खंडित केल्याने पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णतः ठप्प झाली आहे. परिणामी शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून येत्या काही दिवसांत गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे गंगाखेड शहरात आधीच १० ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातच हा अनपेक्षित वीजपुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्यास विलंब झाल्यास शहरातील सामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

नगरपालिकेच्या व संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या वीजबिलाची वेळेत भरपाई न केल्याने संपूर्ण शहराला वेठीस धरले जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

तात्काळ विद्युत थकबाकी भरून फास्ट फिटर लाईनचा वीजपुरवठा सुरू करावा व नियमित पाणीपुरवठ्याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी गंगाखेडकर नागरिकांकडून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Check Also

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ मुंबई – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan …