24/06/26
Breaking News

पर्यावरण रक्षणाच्या शाश्वत संदेशसाठी संत साहित्य हाच खरा आधार प्रा. अनंत मोगल

सेलू ( प्रतिनिधी )
मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते संत साहित्यातून अधोरेखित झाले आहे. संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हणून पर्यावरणाशी नाते जोडले होते. आजच्या जागतिक तापमानवाढीच्या संकटावर संत साहित्य हाच खरा उपाय आहे,” असे प्रतिपादन प्रा. अनंत मोगल यांनी केले.
तालुक्यातील रोहिणा येथे ‘संत साहित्यातील पर्यावरणीय विचार ‘ या विषयावरील रा.से. यो. विशेष वार्षिक शिबिरात आयोजित प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मकरंद बोठे होते.यावेळी बोलतांना प्रा. मोगल पुढे म्हणाले की, संतांनी केवळ शब्दांतून नव्हे तर आपल्या आचरणातून निसर्ग संवर्धनाची शिकवण दिली. जल, जमीन आणि वृक्ष यांचे महत्त्व संतांनी शेकडो वर्षांपूर्वीच ओळखले होते. आजच्या पिढीने हा वारसा जपणे काळाची गरज आहे.वृक्षारोपण आणि जलसंवर्धनाचा संदेश देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील “नगरेचि रचावी। जलाशये निर्मावी। महावने लावावी। नानाविधे॥” या ओवीचा अर्थ उलगडून सांगताना मानवाने शहरे वसवताना तिथे विविध प्रकारची मोठी वने लावावीत आणि जलाशयांची निर्मिती करावी.

अध्यक्षीय भाषणात डॉ. मकरंद बोठे म्हणाले की, पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. संतांच्या विचारांचा वारसा आपण कृतीत आणला, तरच आपण पुढच्या पिढीला सुरक्षित भविष्य देऊ शकू. वाढती पर्यावरण समस्या हा आजच्या काळातील गंभीर विषय असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात डॉ मकरंद बोठे यांनी केले .
या कार्यक्रमाला प्रा. विकास ढाले, प्रा. विनायक शिंदे तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नंदिनी शिंदे तर आभार प्रदर्शन कु. चंचल ढोणे या स्वयंसेवक विद्यार्थिनीनीं केले.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …